पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज त्यात भर पडत आहे. मात्र असं असतानाही महापालिकेने नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार ठप्प आहेत. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकाने खुली करण्याचा निर्णय पालिकेने जाहीर केलाय. प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने खुली राहणार आहेत. तर इतर भागात सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या काळात सर्व दुकाने सुरू राहणार असल्याचं महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं.
पुण्यात प्रशासनाने 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केली आहेत. त्यामुळे आता फक्त याच भागातली दुकाने बंद राहणार आहेत. तर इतर सर्व भागातली दुकाने 12 तास खुली राहणार आहे. सरकारने या आधीच सर्व दुकानांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत. 17 मे रोजी लॉकडाऊन संपणार आहे. मात्र त्या आधीच हळूहळू काही ढिल देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारलाही एक अंदाज येणार असून 17 मे नंतर काय निर्णय घ्यायचे याचाही अंदाज येणार आहे.
त्याच बरोबर लॉकडाऊन हा काही कोरोनाला रोखण्याचा ऐकमेव उपाय नाही असं तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे कोरोनाशी सामना करत सगळे व्यवहार कसे सुरळीत करता येतील याकडे आता प्रशासन लक्ष देत आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाईनशॉप उघडल्यानंतर आता आणखी कडक नियम केले आहे. जाताना गाडी वापरली तर कारवाई केली जाईल. त्यामुळे दारू घ्यायला आता पायीच जाव लागणार आहे. रस्त्यावर येणारी वाहन कुठली हे पोलीस आणि जिल्हा प्रशासन म्हणजे आम्हीच ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुणे विभागातून वेगवेगळ्या राज्यात स्थलांतरित होण्यासाठी मजूर विद्यार्थी कामगार यांच्याकडून मोठी मागणी आहे. 1200 जण जायला तयार असतील तर रेल्वे गाडी सोडायला सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही गाडीमध्ये कुठेही थांबणार नाही असंही ते म्हणाले. मध्यप्रदेश वगळता कुठल्याही सरकार ने मजूरांच्या प्रवासाचे पैसे द्यायची तयारी दाखवलेली नाही. केवळ सरकारी वैद्यकीय तपासणीचं सर्टिफिकेट नाही तर खाजगी डॉक्टरांचही वैद्यकीय तपासणीच सर्टिफिकेट चालणारा आहे. ज्यांना लक्षणे दिसत असतील त्यांचीच चाचणी केली जाणार आहे. सर्वांच्या कोव्हिड टेस्ट करणं शक्य नाही अशी माहितीही प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अधिक वाचा  जरांगेंच्या कृतीने तुम्हाला तोंड काळं करावं लागेल, भुजबळांना टार्गेट करुन धनगरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव : लक्ष्मण हाके