नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी जवळपास एक वर्षापासून मैदानावर दिसला नसला तरी चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल प्रेम कमी झाले नाही. सध्या धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरू आहेत. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये धोनी अखेरचा खेळला होता. आज जाणून घेऊयात धोनीच्या लकी नंबर बद्दल… धोनीचे आणि सात नंबरचे कनेक्शन आहे तरी काय.
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीने देशाला आयसीसीचे ३ मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळेच चाहत्यांमध्ये धोनीची क्रेझ अद्याप आहे. धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी झाला. त्याच्या जन्म तारखेत ७ ही संख्या आहे आणि महिना देखील सातवा आहे. ज्या लोकांची जन्म तारीख ७,१६ आणि २५ असते त्यांचा बर्थ नंबर ७ असतो.
धोनीने २०११ साली महिंद्रा एसयूव्ही गाडी खरेदी केली होती. तेव्हापासून त्याच्या गाडीचा नंबर ७ आहे. याबद्दल बोलताना धोनीने सांगितले होते की, मला न्यूमेरोलॉजीमध्ये विश्वास आहे. एकदा एका स्मार्टफोन कंपनीसोबतचा करार धोनीने ७ डिसेंबर रोजी केला होता. इतक नव्हे तर हा करार त्याने सकाळी ७ वाजता आणि ७ वर्षासाठी केला. विशेष म्हणजे तोपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूने सात वर्षासाठी करार केला नव्हता.
२०१८ साली जेव्हा धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते तेव्हा संघाचे ते तिसरे विजेतेपद होते पण सीएसके संघाची ७वी फायनल मॅच होती. विशेष म्हणजे धोनीला जो जर्सी नंबर मिळाला आहे तो ७ क्रमांकाचा आहे. धोनी जेव्हा फुटबॉल खेळत होता तेव्हा २२ क्रमांकाची जर्सी घालत असे पण क्रिकेट संघात ७ क्रमांकाची जर्सी कोणाकडे नव्हती आणि ती त्याला मिळाली. योगायोगाने धोनीला त्याच्या वाढदिवसाची तारीख असलेली जर्सी मिळाली.
त्यानंतर ७ क्रमांकाची जर्सीच धोनीने आयपीएलमध्ये वापरली. सात क्रमांक धोनीसाठी लकी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकला. त्याआधी २००७ मध्ये पहिला टी-२० वर्ल्ड कप देखील धोनीच्या नेतृत्वाखालीच जिंकला होता.