नवी दिल्ली; गेल्या २४ तासांत विक्रमी १९५ मृत्यूंची नोंद आणि ३९०० नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे भारतावर करोना संकटाचेढग गडद होत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने मृत्यूंची नोद झाल्यामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. भारतात आता करोना रुग्णांची संख्या ४६ हजार ४३३वर पोहोचली आहे.
पश्चिम बंगालमध्ये रुग्ण आणि मृतांच्या संख्येबाबत विलंबाने नोंद केली जात आहे. अशा राज्यांकडून वेळेवर माहिती मिळत नसल्यामुळे त्यांच्याकडे पाठपुरावा करून ताजी आकडेवारी मिळविल्यामुळे मृत्यूंची संख्या आणि रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पण राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासनांमुळे करोनाचे नियंत्रण करण्यात आम्हाला यश आले आहे, असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी केला.

लॉकडाउनमुळे करोनाला नियंत्रणाखाली ठेवण्यात चांगले यश मिळाले असून रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण ३.४ दिवसांवरून १२ दिवसांवर गेले. हे यश कायम ठेवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. मात्र, गेल्या १२ दिवसांत भारतातील करोनारुग्णांची संख्या २३ हजारांवरून ४६ हजारांवर पोहोचली आहे. इतर देशांमध्ये सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत होती. पण लॉकडाऊन आणि नियंत्रणाच्या प्रयत्नांमुळे भारतात रुग्णसंख्येत वाढ झाली नाही. भारतात रुग्णसंख्या वाढीचा आलेख अजूनही पूर्वीसारखाच आहे. हे रोजचे आव्हान आहे. हा आलेख स्थिर ठेवून खाली आणण्यासाठी आम्हाला अहोरात्र सतर्क राहावे लागणार आहे, असेही अग्रवाल म्हणाले.
वेळेवर नोंदीसाठी राज्यांना इशारा
आम्ही एका संसर्गजन्य रोगाशी भारताचा सामना असल्यामुळे रुग्णांची आणि त्यांच्या व्यवस्थापनाची वेळीच नोंद होणे खूप महत्त्वाचे आहे. पश्चिम बंगालचे नाव न घेता काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या आणि मृत्यूंच्या आकड्यांविषयी तफावत निर्माण झाली होती. ती आता पाठपुराव्यानंतर दुरुस्त झाली असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये गेल्या २४ तासांत मृत्युसंख्या अचानक वाढून ९८वर गेल्यामुळे केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये तणाव वाढला आहे. पश्चिम बंगालमध्ये मृतांच्या तसेच रुग्णांच्या आकड्यांत हेराफेरी केली जात असल्यामुळे केंद्र सरकारचा रोष वाढला आहे. प्रत्यक्ष व्यवस्थापन, सुरक्षित वावर याबाबतीत थोडीशीही दिरंगाई झाल्यास त्याचे गंभीर परिणाम आम्हाला भोगावे लागतील, असा इशाराही अग्रवाल यांनी दिला. रुग्णसंख्या, त्यांच्या संपर्कात आलेले लोक, सक्रिय रुग्ण आणि त्यांचे वैद्यकीय व्यवस्थापन याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्राने राज्यांना दिले आहेत.
१३ हजार रुग्ण बरे
देशभरात आजवरच्या करोनाग्रस्तांची संख्या ४६ हजार ४३३ झाली आहे.त्यापैकी १३ हजार १६० करोना रुग्ण बरे झाले असून, २४ तासांत १०२० रुग्ण बरे झाले. सक्रिय रुग्णांची संख्या ३२ हजार १३८ इतकी आहे. गेल्या २४ तासांत करोनाच्या ३९०० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या २४ तासांत १९५ जणांचा मृत्यू होऊन एकूण मृतांचा आकडा १५८३वर पोहोचला आहे. करोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी २७.४१ इतकी आहे. सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये आतापर्यंत ११ लाख ९१ हजार ९४६ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
७० हजार श्रमिकांची घरवापसी
भारतीय रेल्वेने आतापर्यंत कामगार आणि स्थलांतरित श्रमिकांसाठी ६२ विशेष गाड्या सोडल्या असून या सोयीचा ७० हजार प्रवाशांनी वापर केला आहे. आज, बुधवारी आणखी १३ गाड्या सोडण्यात येणार आहेत.
मुंबईत एका दिवसात २६ मृत्यू
महाराष्ट्रात मंगळवारी ८४१ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १५ हजार ५२५ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत करोनाबाधित ३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी २६ रुग्ण मुंबईचे आहेत. एका दिवसातील मुंबईतील मृत्यूचा हा आकडा सर्वात मोठा आहे.
समूहसंसर्ग रोखण्यात यश-हर्षवर्धन
करोनाला भारताने समूह संसर्गापासून रोखण्यात यश मिळविले असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला. करोनाची लस विकसित होईपर्यंत सुरक्षित वावर हीच भारतासाठी सर्वात मोठी लस ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. करोनाचे संकट संपल्यानंतरही हात स्वच्छ ठेवण्याची जनतेत सवय कायम राहिली तर तो मोठा फायदा ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  पेरिविंकलचा विराज मनोज जरांगेंच्या भूमिकेत; “आम्ही जरांगे” या चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात 14 जून रोजी प्रदर्शित होणार