पुणे शहरात करोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना करण्यात येत असून सध्याच्या स्थितीत सहाशे ते साडेसहाशे करोनाग्रस्त रुग्णांच्या चाचण्या होत आहेत. येत्या आठवड्याभरात हेच प्रमाण १,५०० वर नेण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी दिली.
म्हैसेकर म्हणाले, पुणे शहरातील पाच वॉर्डमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढत आहे. या वॉर्ड्सवर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. येथील प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात असून प्रत्येक नागरिकाला प्रशासनाच्या माध्यमातून मास्कचे वाटप केले जात आहे.
पुणे जिल्ह्यातून बाहेर जाताना प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे. ज्यांना एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जायचं आहे, अशांना खासगी वाहनातून प्रवास करण्यास परवानगी देण्यात येणार आहे तसेच बसेसनाही परवानगी देण्यात येत आहे. यामध्ये प्रवासासाठी आम्ही कामगार आणि विद्यार्थी वर्गालाच प्राधान्य देत आहोत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मद्य विक्रेत्यांनी नियमांचे पालन न केल्यास परवाना रद्द
पुणे शहर आणि इतर भागात मद्याच्या दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळाली. या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन व्हावे यासाठी दुकानाबाहेर चौकोन आखावेत, ग्राहकांना टोकन द्यावेत अशा सूचना करताना जर या नियमांचे पालन केले नाही तर संबधित विक्रेत्याचा परवाना रद्द केला जाईल, अशा इशाराही म्हैसेकर यांनी दिला.
सार्वजनिक शौचालयमुळे करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
पुणे शहरातील करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले जे पाच वॉर्ड आहेत. या भागात मागील ४० दिवसांमध्ये रुग्ण संख्येत कमालीची वाढ होत आहे. याचं पुढं आलेलं प्रमुख कारण म्हणजे इथली सार्वजनिक शौचालयं, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. त्यामुळे या भागातील शौचालयांची स्वच्छता अधिकाधिक ठेवण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. दरम्यान, ११ पोलिसांना करोनाची लागण झाली असून त्या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस विभागाने घेतली आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिली. मागील वर्षी एप्रिल महिन्यात नियंत्रण कक्षात साधारण २ हजार ७७० कॉल्स आले होते. मात्र, एप्रिल २०२०मध्ये ही संख्या दुप्पटीने वाढली असून ६ हजार ८८० वर पोहोचली आहे. यामध्ये कोणाला बाहेरगावी जाण्यासंदर्भात पासेसची व्यवस्था, औषधांची सेवा, रूग्णालयात जाता यावे, अन्नपाण्याची सोय आदी अत्यावश्यक सेवांसंदर्भात फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  ठाकरे गटाच्या 12 जागांवर उमेदवारांचा पराभव जिव्हारी; वचपा काढणारच; शिवसैनिकांच्या साथीने भीष्म प्रतिज्ञा