नागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. परंतु, तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून काही अटी शिथील करण्यात आल्या आहे. तशा सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहे. परंतु, नागपूरमध्ये मुंबई-पुण्याप्रमाणे लॉकडाउन राहील, अशी भूमिका पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली होती. परंतु, भाजप नेत्यांच्या टीकेनं मुंढेंना नरमाईची भूमिका घ्यावी लागली.
शिस्तप्रिय अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यांच्या बेधडक कामगिरीमुळे जवळपास जिथे त्यांची बदली झाली तिथे लोकप्रतिनिधींसोबत वाद झाला हे आता नवीन राहिलेलं नाही. नागपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्यामुळे मुढेंनी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशभरासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन जाहीर झाले आहे. लॉकडाउन 3.0 मध्ये केंद्र आणि राज्य शासनाने झोननिहाय काही शिथिलता जाहीर केली आहे. मात्र, नागपूर शहर हे ‘रेड झोन’ मध्ये असल्या कारणाने इथं कुठलंही शिथिलता राहणार नाही, असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं होतं.
पण, केंद्राने सूचना दिल्यानंतर मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात परिस्थितीत गंभीर असतानाही अटी शिथील करण्यात आल्या आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी मुंढेंच्या भूमिकेला कडाडून विरोध केला. एवढंच नाहीतर नागपूर खंडपीठातही आव्हान देण्यात आलं आहे.
अखेर वाढता विरोध आणि केंद्राच्या सूचना पाहता तुकाराम मुंढे यांना नरमाईची भूमिका घ्यावी लागली. तुकाराम मुंढे यांनी जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलमधील आणि रहिवाशी परिसरातील होजीअरी, स्टेशनरी दुकाने, बांधकाम आणि 10 टक्के कर्मचारी उपस्थिती सह शासकीय कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील प्रतिबंधित चार झोनमध्ये मात्र संपूर्ण लॉक डाऊन राहील, फक्त सहा झोनमध्ये ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खाजगी कार्यालय, दारूची दुकानं, बार, मॉल, हॉटेल्स हे पूर्णपणे बंद राहतील.
तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झाल्यावर राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता जाहीर केली होती. मात्र, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर शहरात कुठलीही शिथिलता न देण्याची भूमिका घेतली होती. अखेर नरमाईची भूमिका घेतल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी स्वागत केलं आहे. लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे मुंढे यांनी अवघ्या 24 तासात आपला निर्णय बदलावा लागला आहे.

अधिक वाचा  अर्थंसंकल्पात होऊ शकतात हे मोठे बदल ; कर सवलतीसह HRA पर्यंत…