बारामती: पुणे जिल्ह्यात एमआयडीसी सुरु करण्यास परवानगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी(दि. ४) दिली.मात्र, दुसऱ्याच दिवशी एमआयडीसी परिसरातील कटफळ गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यामुळे कटफळ सह एमआयडीसी परिसर सील होण्याची टांगती तलवार उद्योगांवर होती.मात्र, ‘कंटेन्मेंट झोन’ मधुन हा परिसर वगळल्याने एमआयडीसी सुरुच राहणार असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेबकांबळे यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. बारामती तालुक्यातील कटफळ येथे हा रुग्ण सापडला. त्याच्यावर मुंबई येथे शहरात उपचार सुरु आहेत. बारामती एमआयडीसी परिसर कटफळ गावालगत आहे. महत्वाच्या कंपन्या याच परिसरात आहेत. मात्र, कोरोना बाधित रुग्ण सापडल्यावर कटफळ गाव ”बफर झोन ” म्हणुन घोषित करण्यात आले. आज सापडलेल्या रुग्णामुळे उद्योग सुरु करण्याची गणिते बदलण्याची भीती उद्योजकांना होती. मात्र, एमआयडीसी परिसर ‘कंटेन्मेंट झोन’ मधुन वगळण्यात आल्याचे प्रांताधिकारी कांबळे यांनी ”लोकमत”शी बोलताना स्पष्ट केले आहे. उद्योग सुरुच राहणार आहेत. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील कामगार वापरु नये.त्या भागात कोणतीही वाहतुक करु नये,अशा सुचना दिल्याचे प्रांताधिकारी कांबळे यांनी सांगितले.
एमआयडीसी नुकतीच सुरु झाल्याने कंपनी सुरु करण्याच्या हालचाली सुरु असतानाच कोरोनाचा रुग्ण सापडला.त्यामुळे कंपनी सुरु होणार का, असे प्रश्नचिन्ह उद्योग विश्वासमोर होते.त्यातुन उद्योजक,कामगार,कच्चा माल पुरवठादार यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज चे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांच्याकडे याबाबत विचारणा करणारे अनेक फोन आल्याचे कुंभार यांनी ” लोकमत”शी बोलताना सांगितले.दरम्यान, उद्योजक संघटना पदाधिकाऱ्यांची या भीतीने दमछाक झाली होती.मात्र, प्रशासनाच्या निर्णयामुळे उद्योजकांचाजीव आता भांड्यात पडला आहे.
…उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखल
आज कोरोना रुग्ण सापडलेला कटफळ परीरात एमआयडीसी आहे.या भागात अनेक कंपन्या आहेत. नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील कंपन्या सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी याच भागात रुग्ण सापडला आहे.त्यामुळे प्रशासन या भागात निर्बंध लादण्याची शक्यता लक्षात घेवुन उद्योजकांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संपर्क साधुन याबाबत उद्योजकांच्या वतीने विनंती केल्याचे सांगितले. पवार यांनी या मागणीची दखल घेतल्याचे जामदार म्हणाले. दरम्याप, कटफळ परिसरातील कोणालाही काही दिवस कामावर येऊ न देण्याची सूचना प्रशासनाने केल्याचे अध्यक्ष जामदार यांनी सांगितले.