मुंबईत प्रस्तावित असलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राज्यातील राजकारण तापलं आहे. या वादात शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. त्याला भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी उत्तर दिलं. “राष्ट्रवादीच्या नादाला लागून सुभाष देसाईंसारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला आहे,” अशी टीका तावडे यांनी केली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी सरकारनं मुंबईत प्रस्तावित असलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या निर्णय घेतल्याचा आरोपही काही नेत्यांनी केला आहे. यावरून भाजपा आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. या मुद्यावरून शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी गौप्यस्फोट केला आहे. “आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत व्हावे, यासाठी दोन वेळा कॅबिनेट बैठकीमध्ये प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याकडे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केलं,” असा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एका मुलाखतीत केला. देसाई यांनी केलेल्या दाव्याला भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना उत्तर दिलं आहे.
विनोद तावडे काय म्हणाले?
“मंत्रिमंडळ बैठकीत सुभाष देसाई यांनी एकदाही विषय काढला नाही. हे खात्रीनं सांगू शकतो. याउलट अजेंड्यावर नसलेला एखादा विषय शिवसेनेच्या मंत्र्यानं बैठकीत काढला की, लगेच ते लगेच पत्रकार परिषद घेऊन बातम्या छापून आणायचे. मंत्रिमंडळ बैठकीत जर उद्योग खात्याचा विषय असेल, तर सुभाष देसाई हे लक्ष द्यायचे. इतर विषय असल्यावर त्यांचं लक्षही नसायचं. असं असताना करोनाच्या परिस्थितीत राज्य सरकार काही करू शकत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राचा विषय चालवत आहेत. त्यांच्या नादाला लागून सुभाष देसाई यांच्यासारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला आहे. हे अतिशय वाईट आहे. त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असेल, तर पुरावे द्यावे. नुसतं हवेत कशाला बोलायचं. त्यामुळे मला वाटतं देसाई यांचं हे वागणं बरं नव्हं,” असं तावडे यांनी म्हटलं आहे.