इराणने आपले चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने आपले रियाल हे चलन बदलून त्याऐवजी तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. बदललेल्या चलनानुसार एका तोमानची किंमत ही १० हजार रियाल इतकी असणार आहे. अमेरिकेने इराणवर टाकलेल्या प्रतिबंधांमुळे मागील काही महिन्यांपासून इराणी चलनाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळालं होतं. हीच घसरण थांबवण्यासाठी इरणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी इराणच्या संसदेमध्ये यासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आलं. इराणी वृत्तसंस्था आयएसएनएने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने हा प्रस्ताव सादर केला. इराणची सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय बँक असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इराणला चलन बदलण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. चलनामधून चार शून्य हटवण्याची चर्चा इराणमध्ये २००८ पासून सुरु होती. मात्र २०१८ नंतर यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी जोर धरु लागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१५ मध्ये इराणबरोबरच्या अणुकरारामधून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर इराणच्या चलनाचे मुल्य घसरु लागले.
ट्रम्प यांनी इराणबरोबरचा करार रद्द करण्याबरोबरच इराणवर अनेक आर्थिक निर्बंधही लादले. याच कारणामुळे इराणच्या चलनाचे मूल्य ६० टक्क्यांपर्यंत घसरले. परदेशी चलनासंर्भात माहिती देणाऱ्या वेबसाईट्सनुसार रियाल डॉलरच्या तुलनेत एक लाख ५६ हजार इतका घसरला आहे. इराणी चलनाची किंमत घसरल्याने आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर कमकुवत झाल्याने महागाई वाढली आणि याच पार्श्वभूमीवर २०१७ च्या शेवटी देशामध्ये अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली होती. आता चलनामध्ये बदल केल्याने सामान्यांना दिलासा मिळणार असल्याची सांगितले जात आहे. जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती मर्यादित राहतील असंही सांगितलं जात आहे.
अमेरिका आणि इराणमधील संबंध दिवसोंदिवस बिघडताना दिसत आहेत. मागील अनेक वर्षांपासून हे संबंधांमध्ये कटूता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेने याच वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये इराणचे प्रमुख लष्करी कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या केली. अमेरिकेने सुलेमानी इराक विमानतळावर असतानाच ड्रोनने त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतर इराणने याबद्दल संताप व्यक्त करत अमेरिकेला याची किंमत मोजावी लागेल असं म्हटलं होतं.