बंगळुरू : लॉकडाऊनमुळे गेल्या 40 दिवसांपासून बंद असलेली दारुची दुकानं आज उघडली आणि मद्यप्रेमींनी नुसत्या उड्या टाकल्या. सकाळपासूनच सगळ्या नियमांची ऐसीतैसी करत देशभर दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. ही गर्दी एवढी वाढली की अनेक ठिकाणी पोलिसांना लाढीचार्ज करावा लागला. कर्नाटकमध्ये 9 तासांमध्ये तब्बल 45 कोटींची दारु विकल्या गेली. ही माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. दारुची दुकानं उघडण्याचा आजचा पहिलाच दिवस होता.
मात्र लोकांनी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी होत आहे. तर काही ठिकाणी हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आज 3.9 लाख लीटर ​बीयर (Beer Sales) आणि 8.5 लाख लीटर इंडियन मेड लिकर (IML) म्हणजेच देशी दारुची विक्री झाल्याची माहितीही उत्पादन शुल्क विभागाने दिली.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मथुरामधील एका पोलीस चौकीचे प्रमुख आणि 3 जवानांनी मिळून 5822 दारूच्या पेट्या बाजारात विकल्या. या दारुच्या पेट्या पोलिसांनी विविध ठिकाणांहून जप्त केल्या होत्या.
या दारूची किंमत कोटींमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात एसएसपी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करीत त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये स्वत: एसएसपी यांनी या प्रकरणात खुलासा केला आहे. यामध्ये एका दारू माफियाचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वी कोसीकलामध्ये दारुने भरलेला ट्रक पकडण्यात आला होता. ट्रक जप्त केल्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेतला होता. मात्र काही दिवसांनी ट्रकमधून अर्धी दारू गायब झाली. याबाबत एसएसपी मथुरा यांना माहिती मिळाली. त्यांनी काही जवानांसह स्टिंग ऑपरेशन केलं. गायब झालेली दारू खरेदी करण्यासाठी ही टीम दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी पोहोचली.
तेथेच आरोपी जवानाची कार उभी होती. त्याने गाडीतून काढून दारूची बाटली दिली. त्यानंतर टीमने त्या पोलिसाला ताब्यात घेतले. कोरोनाच्या संकटात देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 35 हून अधिक दिवसांपासून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आज काही भागांमध्ये दारूची दुकाने सुरू करण्यात आली आहे. मात्र वाढणारी गर्दी पाहता अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

अधिक वाचा  भिवंडीत होणार तिरंगी लढत; वंचितकडून निलेश सांबरेना उमेदवारी