मुंबई : कोरोनाच्या महासंकटात महाराष्ट्रात आता महत्त्वाच्या विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी महाविकासआघाडीच्या नेत्यांची इच्छा आहे. परंतु, काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होत आहे. रिक्त झालेल्या 9 जागांपैकी सत्ताधारी शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि काँग्रेस 1 आणि भाजप 4 असे उमेदवारांचे समीकरण ठरल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसने महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांप्रमाणे त्यांचेही 2 उमेदवार निवडून आणण्यासाठी आग्रही असल्याचं समजत आहे. मात्र, असं ठरल्यास 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात उतरल्यास निवडणूक बिनविरोध न होता. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होऊ शकते.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सर्व राजकीय नेते बिनविरोध निवडणूक करण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीतून कुणाची नावं आहेत चर्चेत?
तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाकडून विधानपरिषद निवडणूक उमेदवारीसाठी हेमंत टकले, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर या इच्छुकांची नाव चर्चेत आहेत, तर काँग्रेस पक्षाकडून मोहन जोशी, माणिकराव ठाकरे , नसिम खान, मुजप्फर हुसेन यांची नाव चर्चेत आहेत.
राष्ट्रवादीत सु्प्रिया सुळे या त्यांच्या निकटवर्तीय रूपाली चाकणकर, आदिती नलावडे यांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील तर अजित पवार हे अमोल मिटकरी, नजीम मुल्ला यांच्या नावासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शिवसेनेकडून दोन नाव निश्चित
तर, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची लगबग सुरू झाली आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांची नावं विधान परिषदेसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई, ठाणे, रायगड या मतदार संघातील शिवसेनेच्या आमदारांच्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जावर सह्या करण्यात आल्या असल्याचं कळतंय. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे.

अधिक वाचा  पावसाची पुन्हा दमदार हजेरी?; जुलै महिन्याची सरासरी 14 दिवसांत पूर्ण; 20 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी