नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतात करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी एकदा वाढवण्यात आला आहे. आता तिसरा लॉकडाऊन 4 मे ते 17 मे असा असणार आहे. मात्र, आधीच्या लॉकडाऊनप्रमाणे यावेळी जास्त निर्बंध नसतील. याबाबत काही अटी शिथिल कऱण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार देशातील जिल्ह्यांची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे. त्या झोननुसार अटी आणि नियमांमध्ये सूट दिली जाणार आहे.
लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेकदा दारुची दुकाने सुरू करण्याचा मुद्दा समोर आला होता. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये दारुची दुकानं आणि पान टपऱ्या सुरू ठेवण्याचा विचार सरकार करत आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत यासाठी परवानगी दिली जाऊ शकते.
दारुची दुकाने आणि पान शॉप उघडण्यासाठीची परवानगी ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांत दिली जाईल. मात्र यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल. दोन व्यक्तींमध्ये किमान 6 फुटांचे अंतर आवश्यक असेल. तसंच एकाच वेळा पाच पेक्षा जास्त लोक दुकानामध्ये असणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागेल अशीही माहिती देण्यात आली आहे.
काय बंद राहणार?
तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा, हवाई वाहतूक, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक बंद राहणार आहे. याशिवाय सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेज यांनाही सुट्टी असेल. मॉल, सिनेमा हॉल आणि स्पोर्ट क्लब 17 मे पर्यंत बंद राहतील.
ग्रीन झोनमध्ये काय राहणार खुलं?
ग्रीन झोनमध्ये लॉकडाऊनच्या काळात काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या काळात 50 टक्के क्षमतेनेच प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे. तसंच संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत इतर अनावश्यक व्यवहार बंद राहणार आहे. बस डेपोमध्ये 50 टक्केच कर्मचारी काम करतील.