मुंबई : विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर उर्वरित आठ जागांवर कुणाची वर्णी लागणार याचीही चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. ११ मे रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यादिवशी सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या प्रमुख चार पक्षांकडून कुणाला उमेदवारी मिळते हे स्पष्ट होईल. नऊ पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे १४ मे रोजी म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल. ९ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिले तर २१ मे रोजी निवडणूक अटळ असेल. कोरोनामुळे राजकीय पक्ष ही निवडणूक बिनविरोध करतील का हा देखिल महत्वाचा प्रश्न आहे.
कुणाला किती जागा मिळणार?
विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एका उमेदवाराला विजयासाठी ३२ मतं मिळवावी लागणार आहेत. सध्याच्या पक्षीय बळानुसार भाजपच्या ३, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी २ जागा सहज निवडून येतील. काँग्रेसची १ जागा निवडून येईल. नवव्या जागेसाठी निवडणूक झाली तर काँग्रेसला दुसऱ्या जागेसाठी आणखी १९ मतांची गरज असेल. भाजपला चौथी जागा जिंकायची असेल २३ जागांची गरज आहे. तर भाजपलाही काही अपक्षांचा पाठिंबा असल्याने आणखी काही मतं फोडावी लागतील. गुप्त मतदान पद्धती असल्याने या निवडणुकीत कोणत्या सदस्याने कुणाला मतदान केलं हे कळत नाही. त्यामुळे निवडणूक झालीच तर ती रंगतदार होईल यात शंका नाही. पण सध्याची चर्चा पाहता भाजप ३ आणि शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना प्रत्येकी दोन जागा मिळतील अशी शक्यता आहे.
कोणते सदस्य निवृत्त झाले?
२४ एप्रिल रोजी ९ सदस्यांची मुदत संपल्याने ही निवडणूक होत आहे. मुदत संपलेल्या सदस्यांमध्ये शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, किरण पावसकर, आनंद ठाकुर, भाजपच्या स्मिता वाघ, पृथ्वीराज देशमुख, अरुणभाऊ अडसड, काँग्रेसचे चंद्रकांत रघुवंशी आणि हरिसिंह राठोड यांचा समावेश आहे. यापैकी चंद्रकांत रघुवंशी आता शिवसेनेत आहेत. तर राठोडही काँग्रेसपासून दुरावले आहेत.
विधानपरिषदेवर कुणाची वर्णी लागणार?
शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची नावे निश्चित आहेत. राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. तर हेमंत टकले, किरण पावसकर आणि आनंद ठाकुर यांच्यापैकी कुणाला पुन्हा संधी मिळणार की नवा चेहरा दिसणार याबाबतही उत्सुकता आहे. यांनाही पुन्हा संधी मिळू शकते. काँग्रेसकडून इच्छुकांची मोठी यादी असली तरी अनपेक्षित चेहरा पुढे येऊ शकतो.
भाजपमधून कुणाला संधी मिळणार याची प्रचंड उत्सुकता आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकाश मेहता यांची नावे सध्या चर्चेत आहेत. यापैकी पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत परळीत पराभव झाला, तर इतर नेत्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती. भाजपने याआधीच त्यांची नावे केंद्रीय नेतृत्वाला कळवली आहेत. तिघांची नावे आता दिल्लीतूनच जाहीर होतील. काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत घोळ घातला जाईल, अशी शक्यता आहे. तर राष्ट्रवादीत याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.
उद्धव ठाकरेंची संपत्ती किती?
आदित्य ठाकरे यांच्या रुपाने विधानसभा निवडणुकीत ठाकरे घराण्यातील पहिले सदस्य निवडणुकीत उतरल्याने त्यांची संपत्ती प्रथमच जनतेसमोर आली. यावेळी उद्धव ठाकरे निवडणुकीत उतरणार असल्याने त्यांनाही प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा तपशील द्यावा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती आहे हे प्रथमच जनतेसमोर येणार आहे.
विधानपरिषदेतील संख्याबळावर काय परिणाम?
या निवडणुकीमुळे विधान परिषदेतील संख्याबळात फारसा फरक पडणार नाही. पण जुलैमध्ये राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणुकीनंतर भाजपच्या विधान परिषदेतील नंबर एक या स्थानाला धक्का लागू शकतो. हे सदस्य नेमताना राज्यपाल आणि सत्ताधारी यांच्यात राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.