करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत अडकलेले ऊसतोड कामगार मूळगावी आल्यानंतर त्यांचे २८ दिवस घरातच अलगीकरण करण्यात येणार आहे. परतलेल्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करून हातावर अलगिकरणाचा शिक्का मारला जाणार आहे. बाहेरून येणाऱ्या या लोकांमुळे कोणताही संसर्ग होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना गाव पातळीवरील यंत्रणेला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या आहेत.
बीडसह अनेक भागातील ऊस तोडणी मजूर व त्यांचे कुटुंबीय करोनाच्या टाळेबंदीमुळे राज्यातील विविध साखर कारखान्यावर मागील पंचवीस दिवसांपासून अडकून पडले होते. राज्य सरकारने अखेर विशेष बाब म्हणून ऊसतोड मजुरांना गावाकडे परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात मोठ्या संख्येने ऊसतोडणी मजूर परत येणार असल्याने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रत्येकाची काटेकोरपणे वैद्यकीय तपासणी करून ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेनुसार नाकाबंदीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या विविध मार्गांवर वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचार्‍यांच्या माध्यमातून सुसज्ज यंत्रणा उभी करण्यात आली आहे. परतणाऱ्या लोकांकडे विहित नमुन्यात वैद्यकीय तपासणी केल्याचे प्रमाणपत्र आहे का? याची खात्री केल्यानंतर प्रत्येकाचे घरातच अलगीकरण करण्यात येत असल्याचा शिक्का मारण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांना घरातच २८ दिवस रहावे लागणार आहे. प्राथमिक तपासणीत ताप 100 पेक्षा जास्त असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुन्हा तपासणी करुन घेण्यात येणार आणि गावात अलगीकरणाची व्यवस्था केली जाणार आहे. तर काही लक्षणं असल्यास सदर व्यक्तीस संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल करावे लागणार आहे. नागरिकांना शेतात व अन्य ठिकाणी पाठवण्यापूर्वी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत समुपदेशन करून हस्तपत्रिका देण्यात यावी. अशा सुचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या आहेत.
टाळेबंदीत अडकलेल्या ऊसतोडणी मजूरनां मुळगावी परत पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतल असुन दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी व वैद्यकीय तपासणीनंतरच त्यांना आपल्या घरी येता येणार आहे. यासाठी थोडावेळ ही लागेल मात्र कोणीही घाई करून प्रशासनाच्या परस्पर येण्याचा प्रयत्न करू नये. जिल्ह्यात प्रवेशासाठी अधिकृत 15 ठिकाणाहून तपासणी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे अवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

अधिक वाचा  अमित शाह यांची स्वतंत्रपणे भेट एकच सवाल अन् एकनाथ शिंदे निरुत्तर! आत्ता फक्तं यासाठी आग्रही