करोना व्हायरसमुळे जगामध्ये सध्या अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते सर्वसामान्य नागरिक चीनला जबाबदार ठरवत आहेत. प्रत्येकाच्या मनात संतापाची भावना खदखदत आहेत. त्यासाठी रोज चीनला दूषणे दिली जात आहेत. करोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश लॉकडाउनमध्ये आहेत.
या व्हायरसमुळे जगभरात जवळपास दीडलाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्व आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने अनेकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अंधेरीतल्या एका वकिलाने मनातील संताप फक्त व्हॉट्स अॅपवरुन चीन विरोधी मेसेज फॉरवर्ड करण्यापुरता मर्यादीत ठेवलेला नाही. त्याने त्यापुढे जाऊन कायदेशीर पाऊल उचलले आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.
आशिष सोहानी असे या वकिलाचे नाव आहे. त्यांनी चीन विरोधात खटला दाखल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात धाव घेतली आहे. चीनने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पावले उचलली नाही तसेच आपल्या सीमेबाहेर करोनाचा फैलाव होऊ दिला असे आरोप आशिष यांनी याचिकेतून केले आहेत.
३३ पानांच्या या याचिकेमध्ये त्यांनी भारत सरकारच्यावतीने चीनकडे भारतीय चलनात १९० लाख कोटी रुपयांची मागणी केली आहे. आशिष सोहानी (३२) मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त प्रदीप सोहानी यांचा मुलगा आहे. ११ मे रोजी आशिष यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कोर्टात ई-याचिका दाखल करण्यासाठी पाठवली. तीन दिवसांनी त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून याचिका विचाराधीन असल्याचा मेसेज आला.
आशिष यांनी सर्वोच्च न्यायालयतही चीन विरोधात याचिका दाखल केली आहे. चीनने कलम २५ (१) नुसार मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे तसेच चीनने आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमनाच्या कलम २,३,५,६,७,८ आणि ९ चे ही उल्लंघन केल्याचे आशिष यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
चीनशिवाय सोहानी यांनी याचिकेमध्ये त्या देशातील राष्ट्रीय आरोग्य आयोग, हुबेई प्रांत सरकार आणि वुहान महापालिकेचे नावही घेतले आहे. चीनमधील आरोग्य आयोग आणि महापालिकेने मानवतेविरोधात गुन्हा करणारी कृती केली आहे असे आशिष सोहानी यांनी म्हटले आहे.
आशिष सोहानी यांची आई मुंबई फॅमिली कोर्टातील निवृत्त न्यायाधीश आहेत. हा व्हायरस किती भयंकर आहे, त्याची चीनला पूर्ण कल्पना होती आणि त्याचे पुरावे देखील आहेत. तरीही त्यांनी सुरुवातीच्या स्टेजमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी फार काही केले नाही असे आशिष यांचे म्हणणे आहे.