सध्या जगभरात करोना व्हायरसवर लस शोधण्याचे काम वेगात सुरु आहे. भारतही यामध्ये मागे नाही. भारतीय शास्त्रज्ञ बहुउद्देशीय लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुष्ठरोगावर प्रभावी ठरलेली लस करोना व्हायरसवर सुद्धा परिणामकारक ठरु शकते का? त्या दृष्टीने भारतात संशोधन सुरु आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
“ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डीसीजीआयकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. आम्ही एमडब्ल्यू लसीच्या चाचण्या सुरु केल्या आहेत. कुष्ठरोगाविरोधात ही लस यशस्वी ठरली होती” असे सीएसआयआरचे महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी सांगितले.
“लस बनवणे ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. यावर संशोधन सुरु आहे. शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱी लस बनवण्यावर आम्ही काम करत आहोत. आम्ही अजून दोन परवानग्यांसाठी थांबलो आहोत. आम्हाला या परवानग्या मिळाल्या की, चाचण्या सुरु होतील. पुढच्या सहा आठवडयात याचा रिझल्ट मिळेल” असे डॉक्टर मांडे यांनी सांगितले.
करोना व्हायरसला रोखणारी लस बाजारामध्ये उपलब्ध व्हायला अजून १२ महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जगभरात वेगाने फैलावणाऱ्या करोना व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी अमेरिका आणि चीनमध्ये मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. २१ लाख नागरिक या व्हायरसमुळे बाधित झाले असून जवळपास दीडलाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा  आता पुन्हा काका-पुतण्या भिडण्याची चिन्हं, युगेंद्र पवार विधानसभा लढवणार?