देशभरातील करोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेत केंद्र सरकारने लॉकडाउनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे स्थलांतरीत कामगारांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. हातावर पोट असणारे हजारो कामगार वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. २५ एप्रिल रोजी पहिल्यांदा २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली तेव्हा कमाईची सर्व मार्ग बंद होणार असल्याने अनेक मजदूर आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. मात्र लॉकडाउनमुळे रेल्वे तसेच सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बंद असल्याने अनेकजण चालतच आपल्या राज्यामध्ये निघाले आणि ठिकठिकाणी अडकून पडले. तर अनेक शहरांमधील कामगारांकडे रोजगाराचे काही साधनच नसल्याने त्यांचीही परवड होताना दिसत आहे. अनेक राज्यांनी या कामगारांच्या जेवणाची सोय करण्यास सुरुवात केली असली तरी अद्यापही या प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.
कामगारांच्या अनेक कुटुंबांना अन्नधान्य मिळालेलं नाही. असाच एक धक्कादायक प्रकार हरियाणामधील गुडगावमधून समोर आला आहे. लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर मूळचा बिहरमधील असणारा छाबु मंडल हा ३५ वर्षीय कामगार आपल्या कुटुंबासहीत अडकून पडला. पेंटर म्हणून काम करणाऱ्या छाबुने घरातील आठ जणांचे पोट भरण्यासाठी आपला मोबाईल अडीच हजार रुपयांना विकला. त्यामधून घरी अन्नधान्य घेऊन आला. मात्र त्यानंतर घरात कोणीच नसताना घराचा दरवाजा आतून लावून घेत छाबुने गळफास घेतला.
मोबाईल विकून या वस्तू आणल्या आणि…
छाबुची पत्नी पूनम हिने दिलेल्या माहितीनुसार मोबाईल विकून मिळालेल्या पैशामधून छाबुने घरातील लोकांसाठी अन्नधान्य आणि एक पोर्टेबल पंखा विकत घेतला. छाबु आई-वडील, चार मुले आणि पत्नीसहीत राहत होता. छाबुच्या सर्वात छोट्या मुलगा अवघ्या पाच महिन्यांचा आहे. मागील दोन दिवसांपासून आम्ही काहीच खाल्ले नव्हते. त्यामुळे छाबु घरी काही घेऊन आला की सर्वांना आनंद व्हायचा असं पूनम सांगते. लॉकडाउननंतर आम्ही अन्नासाठी शेजाऱ्यांवरच अवलंबून होतो असंही पूनमने सांगितलं. छाबुने अन्नधान्य आणल्यानंतर पूनम काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. छाबुची आई आणि वडील मुलांना घेऊन घरासमोरच्या झाडाखाली बसले होते. घरात कोणीही नसल्याचे बघून छाबुने आपल्या घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर रस्सीच्या सहाय्याने आत्महत्या केली.
जेवणाचे हाल
लॉकडाउन सुरु झाल्यापासून छाबु सतत चिंतेत असायचा असंही त्याच्या पत्नीने सांगितलं आहे. घरातील आठ लोकांसाठीच्या जेवणाची सोय करणे त्यांच्यासाठी कठीण जात होते. लॉकडाउनमुळे कोणतेच काम मिळत नव्हते त्यामुळे पैसेही मिळत नसल्याने जेवणाची सोय करता येत नव्हती. शेजाऱ्यांकडून मोफत मिळणाऱ्या खाण्यावर आम्ही अवलंबून असायचो. मात्र ते ही रोज मिळत नसल्याने अनेकदा उपाशीच झोपावं लागायचं अशी माहिती पूनमने दिली.
अधिकारी म्हणतात करोनाची भिती…
आत्महत्या करणारा छाबु हा मानसिक तणावात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात चौकशी सुरु केली. मात्र यासंदर्भात कोणतीही चौकशी केली जाऊ नये असं छाबुच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणात एफआयआरही दाखल केलेली नाही. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छाबु मानसिक तणावात होता. करोनाची साथ पसरल्याने छाबु चिंतेत होता. खाण्याची कमतरता नव्हती असा दावा जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. छाबुच्या घरापासून जवळच सेक्टर ५६ मध्ये मोफत अन्न वाटप केंद्र असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.