नवी दिल्लीः करोना व्हायरस लॉकडाऊमुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. आता देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच आणखी एक पॅकेज घोषित करणार आहे. खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिलीय.
करोना व्हायरसमुळे औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. यातून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरीबांसह उद्योगांसाठी लवकरच आणखी एक आर्थिक पॅकेज जाहीर केले जाईल, अशी माहिती र्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जागतिक बँकेच्या बैठकीत दिली. व्हिडिओ कन्फरन्सिंद्वारे ही बैठक घेण्यात आली. करोना रुग्णांसाठी उपचारात उपयोगी ठरणाऱ्या औषधांचा पुरवठा गरजवंत देशांना केला जाईल, असं आश्वासन सीतारामन यांनी यावेळी दिलं.
करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने १.७० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केलंय. गरीबांना मोफत अन्नधान्य, आर्थिक मदत, गॅस सिलिंडर पुरवठा आणि सुरक्षेसाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. प्राप्तीकर, जीएसटी, सीम शुल्क आणि वित्त सेवांद्वारे सरकारने लघु मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचं सीतारामन म्हणाल्या. माणुसकीच्या दृष्टीकोणातून अतिरिक्त मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानुसार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर केले जाईल, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या वाढून १३ ८३५ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे १०७६ रुग्ण वाढले आहेत. ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.