नवी दिल्लीः करोना व्हायरचा सामना संपूर्ण जग करतंय. अशा स्थितीत पाकिस्तानच्या सीमेवर कुरघोड्या सुरूच आहेत. भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानचा गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी नियंत्रण रेषेतून दररोज भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने १५ हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला, असं लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी सांगितलं.
भारतीय लष्कर फक्त करोनाशी लढत नाहीए. तर नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानच्या गोळीबाराला आणि घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे. करोना व्हारसच्या संकटात भारत शेजारी देशांना मदत करतोय. दुसरीकडे पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न करतोय, असं जनरल नरवणे म्हणाले.
नियंत्रण रेषेच्या (LoC) पलिकडे दहशतवाद्यांची २० ते २५ तळं आहेत. हे सर्व भारतातील हालचालींवर नजर ठेवून आहेत. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवाद्यांची तळं सक्रिय झाल्याचं जनरल नरवणे यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर (LoC) पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. यात सीमा भागात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना लक्ष्य केलं जातंय. या पार्श्वभूमवीर जनरल नरवणे यांनी काश्मीरचा दोन दिवसांचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी माहिती दिली.
लष्करात आठ जणांना करोनाची लागण झालीय. यापैकी २ डॉक्टर आणि १ नर्स आहे. तर लडाखमध्ये एका जवानाला करोना झालाय. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, असं जनरल नरवणे यांनी सांगितलं. करोनाविरोधी लढाईत भारत इतर देशांना मदत पाठवत आहे. काही देशांमध्ये वैद्यकीय पथकं आणि औषधं पाठवण्यात येत आहेत. पण दुसरीकडे पाकिस्तान दहशतवाद निर्यात करतोय, असं लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे म्हणाले.
दोन दहशतवाद्यांचा खात्मा
पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी राबवलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. किश्तवाडमधील दचन भागात सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून दोन रायफल जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जम्मूच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली.