प्रसिद्ध संगीतकार व गायक विशाल दादलानी सोशल मीडियावर त्याच्या ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत असतो. चालू घडामोडींवर तो बेधडकपणे त्याची मतं मांडताना दिसतो. नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘गृहमंत्री म्हणजे त्यांनी घरीच बसायचं असं अमित शाह यांना कोणी सांगितलंय का’, असा खोचक सवाल त्याने केला. देशभरात इतक्या घडामोडी घडत असताना ते अजूनही का शांत आहेत असा प्रश्न विचारत विशालने त्यांच्यावर टीका केली.
या ट्विटमध्ये विशालने लिहिलं, ‘खरंच, गृहमंत्री म्हणजे त्यांनी घरीच बसायचं असं अमित शाह यांना कोणी सांगितलंय का? देशात इतक्या घडामोडी घडत असताना, इतक्या समस्या असताना आपल्याला अदृश्य गृहमंत्री लाभले आहेत. प्रसारमाध्यमंही त्यांना काहीच प्रश्न विचारत नाहीत.’
तबलिगी मरकज प्रकरण असो किंवा मग वांद्रे येथील गर्दीचे प्रकरण असतो, करोना व्हायरसचे मोठे संकट देशासमोर असताना गृहमंत्री अमित शाह अजूनही शांत का आहेत, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. विशालने याआधीही ट्विटरच्या माध्यमातून सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

अधिक वाचा  प्रत्येकाला मराठ्यांविषयी द्वेष ओकायला लावताय? मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा