नवी दिल्ली : कोरोनामुळे सगळं जग त्रस्त आहे. मृत्यूची संख्या दररोज वाढते आहे. त्याचबरोबर प्रचंड मोठं आर्थिक संकट सगळ्याच देशांवर आलं आहे. लॉकडाऊनमुळे सगळेच आर्थिक व्यवहार मंदावल्याने मोठ मोठ्या कंपन्यांचं बाजार मुल्य कोसळलं आहे. कारण शेअर बाजारात सध्या उठाव नाही. त्यामुळे चीनच्या बलाढ्य कंपन्या या देशातल्या छोट्या कंपन्यांना गिळंकृत करण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला असून थेट विदेशी गुंतवणूकीसाठी आता केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे.
कंपन्यांचे शेअर बाजारातलं मुल्य कमी झाल्याने मोठ्या कंपन्या या लहान कंपन्यांचे शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी करत या कंपन्यांवर ताबा मिळविण्याची शक्यता असते. याच चीनच्या मोठ्या कंपन्या भारतीय कंपन्यांवर डोळा ठेवून असल्याचीही माहिती आली होती.
त्यामुळे या छोट्या कंपन्यांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. चीनची सगळ्यात मोठी बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चायनाने (PBOC) भारतातली सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी असलेल्या HDFC बँकेचे 1.01 टक्के शेअर्स खरेदी केले होते.
जर्मनी, इटली, स्पेन, ऑस्ट्रेलिया या युरोपातल्या देशांनीही अशाच प्रकारचे नियम कडक केले आहेत. भारताच्या या निर्णयामुळे चीनी कंपन्यांना दणका बसणार असून त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनीही याबाबात सरकारला इशारा दिला होता. आपल्या इशाऱ्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला हे चांगलं झालं असं मत राहूल गांधी यांनी ट्विटरवरून व्यक्त केलं आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक बदल झाले आहेत. अनेक कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. दरम्यान भारतातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिस (TCS-Tata Consultancy Services) 2025 पर्यंत वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याच्या विचारात आहे.
कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 म्हणजेच पुढील 5 वर्षापर्यंत कंपनी 75 टक्के स्टाफला वर्क फ्रॉम होम देण्याच्या विचारात आहे. म्हणजे केवळ 25 टक्के कर्मचारी कंपनीच्या कार्यालयातून काम पाहतील.

अधिक वाचा  मुंबईकरांनो काळजी घ्या, डेंग्यू,मलेरियाचे रुग्ण वाढले ; सप्टेंबर महिन्यात 1261 रुग्णांची नोंद