मुंबई : कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्राला विळखा बसला आहे. देशभरात 3 मेपर्यंत लाॅकडाउन कायम असणार आहे. परंतु, सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे राज्याला आर्थिक अडचणीला सामोरं जाण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने आर्थिक घडी विस्कटू नये, यासाठी कंबर कसली आहे.या बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल तसे स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी, 20 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
देशात जाहीर लाॅकडाउनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काल शुक्रवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केल आहे. मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात संचारबंदीची मुदत वाढवण्यात आली असली तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही नियमित सुरू राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
नागरिकांना, कोरोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावं, घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असं आवाहनही केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, ‘संचारबंदीसंदर्भात केंद्राच्या सूचनांचे राज्यात काटेकोर पालन करण्यात येत आहे. संचारबंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. दवाखाने, हॉस्पिटल, औषधांची दुकाने, पॅथोलॉजी सेंटर, ॲम्बुलन्स सेवा सुरू आहेत. शेतीच्या मशागतीच्या कामांवरही कोणतही बंधन नाही. शेती आणि शेती उद्योगाशी संबंधीत सर्व कामे, दुकाने, व्यवहार सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.’
तसंच. ‘तूर, कापूस, हरभरा खरेदी योजना देखील सुरू राहणार आहे. दूधव्यवसाय, पशुपालन, मत्स्योद्योगविषयक कामांनाही परवानगी आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरू राहणार आहेत. अनाथालये, वृद्धाश्रम आदी सामाजिक संस्थांचं कामकाजही सुरू राहील. अंगणवाड्या बंद असल्या तरी बालकांना पोषणआहार घरपोच दिला जाणार आहे. शाळा, कॉलेज बंद असली तरी ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. बँका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरू राहणार असले तरी नागरिकांनी तिथे गर्दी करु नये, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
‘राज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी संचारबंदीला सर्वांनी सहकार्य करावं, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर राखावं, घरातूनच काम करा, घरातंच रहा, सुरक्षित रहा, टाळेबंदीचं पालन करा’, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.