काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत देशातील सद्यस्थितीवर भाष्य केलं. राहुल गांधी यांनी यावेळी सरकारला काही सल्ले देत आपलं मत मांडलं. शिवसेनेने सामना संपादकीयमधून राहुल गांधींचं कौतुक केलं असून संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा ते राहुल गांधी यांनी दाखवून दिले असल्याचं म्हटलं आहे. करोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा असंही यावेळी सांगण्यात आलं आहे.
“पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्यात कोरोनासंदर्भात तरी एखादी चर्चा थेट व्हावी असे हे गांधी विचार ऐकल्यावर प्रत्येकाला वाटत असावे. राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा ते राहुल गांधी यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर अशा घोर प्रसंगी सरकार, तसेच विरोधी पक्षाने काय करावे याबाबत गांधींनी जणू ‘चिंतन शिबीर’च घेतले. त्या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्याविषयी काही प्रवाद असू शकतात. तसे ते कोणाविषयी नाहीत? पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याविषयीदेखील आहेत. भारतीय जनता पक्षाचे निम्मे यश हे राहुल गांधी यांच्या प्रतिमाभंजनातून मिळालेले यश आहे व हे भंजन आजही सुरूच आहे, पण ‘कोरोना’ युद्धात राहुल गांधी यांनी घेतलेल्या संयमी व जागरुक विरोधी पक्षाच्या भूमिकेचे कौतुक करावेच लागेल. देशातील संकटप्रसंगी विरोधी पक्षाने कसे वागावे, काय करावे याची आदर्श आचारसंहिता राहुल गांधी यांनी निर्माण केली आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी कोरोना संक्रमणाचा धोका आधीच ओळखला होता व त्याबाबत ते सरकारला सावध करीत होते. जेव्हा मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यात सगळेच गुंतले होते तेव्हा राहुल गांधी कोरोनासंदर्भात सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत होते. आपल्या देशाला गरज असताना कोरोनाबाबतचे वैद्यकीय सामानसुमान निर्यात करणे थांबवा असे ते वारंवार सांगत होते. पण त्यांचे ऐकायचेच नाही हे सध्याचे सरकारी धोरण आहे. कोरोनाविरुद्धचे युद्ध देशाने एकत्र येऊन लढायला हवे, असे त्यांनी पहिल्या ‘लॉक डाऊन’च्या आधी सांगितले आणि पंतप्रधानांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे ठासून सांगितले अशी आठवण शिवसेनेने करुन दिली आहे.
राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सांगितले की, ‘बाबांनो, ही भांडण्याची वेळ नाही.’ श्री. गांधी पुढे सांगतात ते महत्त्वाचे. अनेक बाबतीत माझे पंतप्रधान मोदींशी मतभेद असू शकतात, पण ही वेळ मतभेद उगाळत, भांडत बसण्याची नाही. कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. भांडत बसलो तर आपल्याला यश येणार नाही. श्री. गांधी यांची ही भूमिका सर्वतोपरी देशहिताची, राजकीय शहाणपणाची आहे. पण सध्या शहाणपणाचा ठेका काही मोजक्या लोकांकडे आहे व त्यांना शहाणपणाचे अजीर्णच झाले असल्याने राहुल गांधी काय बोलतात याकडे पाहणे त्यांना कमीपणाचे वाटत असावे अशी टीका शिवसेनेने केली आहे.
देशात ‘लॉक डाऊन’ वाढवले आहे व ‘लॉक डाऊन’ संपल्यावर आर्थिक अराजकाच्या संकटाशी सामना करावा लागेल. त्याबाबत सरकारने काय केलं? राष्ट्र सेवा म्हणून लोकांनी घरी बसावे हे ठीक, पण राष्ट्र सेवा आणि उपासमार एकत्र नांदू शकत नाही. राहुल गांधी यांनी दोन प्रमुख विषयांना हात घातला आहे व ते सुद्धा राष्ट्रहिताशी निगडित आहेत. ‘लॉक डाऊन’ हा उपाय नव्हे, तर ‘पॉज बटन’ आहे. ‘लॉक डाऊन’ उठले की विषाणू परत त्याचे काम सुरू करेल. यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या लवकरात लवकर चाचण्या करायला हव्यात, असे गांधी यांनी सांगितले आहे. ‘लॉक डाऊन’मुळे व्हायरसचा पराभव होत नाही. ‘लॉक डाऊन’मुळे वैद्यकीय सुविधा तयार करण्यासाठी वेळ मिळतो. म्हणून त्यातून बाहेर पडण्याची रणनिती तयार व्हायला हवी, असे विरोधी पक्षाचे नेते श्री. गांधी सांगतात. गांधी सांगतात ते शंभर टक्के खरे आहे. फक्त घरी बसून हे संकट दूर होणार नाही, तर वाढणार आहे. केव्हा तरी घराबाहेर पडावेच लागेल. मात्र त्यावेळी काय याबाबतचा कोणताही ठोस कार्यक्रम आज तरी दिसत नाही असं शिवसेनेने म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी हे जे सर्व मार्गदर्शन केले ते देशहिताचे आहे. सरकारकडून हे समोर येणे आवश्यक असते, पण रोज संध्याकाळी देशाच्या आरोग्य मंत्रालयातर्फे रटाळ पत्रकार परिषदा घेऊन कोरोनाबाबत माहिती दिली जाते. राहुल गांधी यांची माहिती अधिक प्रगल्भ आहे. प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमांनी तटस्थपणे कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा, पण राहुल गांधी यांचे ऐकणे, त्यांचे विचार पोहोचवणे हा गुन्हा ठरू शकतो अशी अप्रत्यक्ष टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादी सस्पेन्स संपला, राज्यसभेस सुनेत्रा पवार निश्चित, पडद्यामागे काय घडले? नाराज भुजबळांची वेगळी भूमिका?