मुंबई: कोरोनामुळे आपण सारे ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती अनुभवत असलो तरी येणार्‍या काळात भारत मोठा ‘टेक ऑफ’ घेईल, असा आशावाद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते गुरुवारी फेसबुकवर झालेल्या एका चर्चात्मक कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर देशातील परिस्थिती कशी असेल, याबाबत भाष्य केले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कोरोनानंतरच्या युगात जागतिक पातळीवर ट्रेड बॅरियर्स उभे राहण्याची शक्यता असल्याने त्यामुळे स्वदेशी आणि स्वावलंबनावर भर देऊन भारतीय उत्पादनांनी भारतीय बाजारपेठ व्यापली जाईल. बदललेली परिस्थिती ही स्टार्टअपसाठी नेहमीच फायद्याची असते. कोरोनापूर्व आणि कोरोनापश्चात काळ हे दोन स्वतंत्र विश्व असतील. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, सेवा क्षेत्रात काम करणार्‍या स्टार्टअपला आगामी काळ अतिशय चांगल्या संधी देणारा असणार असेल. त्यामुळे भारत मोठी झेप घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चितपणे थोडा ब्रेक लागला आहे. पण, हे चित्र पूर्णपणे निराशावादी नाही. यापूर्वी ५.५ टक्क्यांनी आपली अर्थव्यवस्था विकसित होईल, असा अंदाज होता. एक समाधानाची बाब आहे की लॉकडाऊनंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर उणे राहणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारताकडे असलेले मोठे परकीय चलन, अन्नाचे विपुल भांडार आणि रिझर्व्ह बँकेसारखी शीर्षस्थ संस्था, भारताचा उत्पादनाचे हब म्हणून गतीने होत असलेला विकास या अतिशय जमेच्या बाजु आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच आगामी काळात कृषी क्षेत्राला अधिक प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेती हे सर्वाधिक रोजगारनिर्मितीचे क्षेत्र आहे. आज कापूस, सोयाबीन, तूर हे शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. योग्यवेळी खरेदी झाली नाही, तर त्यामुळे शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था धोक्यात येईल. त्यामुळे ही खरेदी त्वरित करून येणारा खरीपाचा हंगाम सुरळीत होईल. शेतकर्‍यांना आवश्यक कर्ज मिळेल. या सार्‍या बाबी सुनिश्चित कराव्या लागतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

अधिक वाचा  अखेर आतुरता संपली; ‘नवरा माझा नवसाचा 2’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला