मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ३,२०२ वर पोहोचली आहे. आज एका दिवसात राज्यात कोरोनाचे २८६ नवे रुग्ण आढळले आहेत. यातले मुंबईतील १७७ रुग्ण आहेत. तर एका दिवसात ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे १९४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असले, तरी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलासादायक माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातला कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग हा दोन दिवसांवरून ६ दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल तेवढं राज्याच्या दृष्टीने समाधानाचं असेल, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात सुरुवातीला कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग हा दोन दिवस होता, नंतर तो तीन दिवस झाला. आता हाच वेग सुमारे सहा दिवस झाला आहे. हा दुपटीचा कालावधी जेवढा वाढेल तेवढी रुग्णांची संख्या कमी होईल, असं राजेश टोपे म्हणाले.
राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात जास्त आहे. यातले ८३ टक्के मृत्यू हे आधीपासून असलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचा विकार यामुळे झाले आहेत. मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.ही समिती रुग्णांसाठी तातडीने वैद्यकीय सल्ला देईल. यासाठी राज्यातल्या रुग्णालयांना तज्ज्ञांचे फोन नंबर कळवले आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
राज्यात आत्तापर्यंत झालेल्या ५१ हजार चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या या मुंबईत करण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्यांपैकी अडीच टक्के रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्या २१ शासकीय आणि १५ खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या चाचण्या होत आहेत अशी माहिती टोपेंनी दिली. राज्यात कोरोनाचे ३०० रुग्ण बरे झाले आहेत. प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील अँटीबॉडीज काढून इतर रुग्णांना देण्याचे तंत्रज्ञान वापारायचं आहे, यासाठी आयसीएमआरकडे परवानगी मागितली आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
राज्याने केंद्र सरकारकडे ८ लाख एन-९५ मास्कची मागणी केली होती, यापैकी १ लाख मास्क उपलब्ध झाले आहेत. तर ३० हजार पीपीई कीट्स मिळाल्या आहेत, असं राजेश टोपेंनी सांगितलं. दिल्लीच्या मरकजसाठी गेलेल्या तबलिगींपैकी सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. यातले ५० जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.

अधिक वाचा  माढामध्ये जानकरांच्या घरीही मोठी बैठक कोणाचा होणार करेक्ट कार्यक्रम हा झाला मोठा निर्णय? समर्थक आक्रमक