कलबुर्गीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पण तरीही शेकडोंची गर्दी होण्याच्या घटना थांबत नाहीए. दिल्लीतील बस स्थानकांवर स्थलांतरीत मजुरांची गर्दी, दिल्लीतील निझामुद्दीनमध्ये तबलीघी जमात मरकझचा धार्मिक कार्यक्रमात हजारोंची उपस्थिती, सुरतमध्ये शेकडो स्थलांतरीत मजुरांचे ठिय्या आंदोलन आणि मुंबईतील वांद्रेमध्ये स्थलांतरीत शेकडो मजुरांनी केलेले आंदोलन या घटनांनंतर आता कलबुर्गीमधील एका धार्मिक सोहळ्यात शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावल्याचं समोर आलंय.
लॉकडाऊनमध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम, सोहळे आणि संमेलनांवर बंदी असताना कलबुर्गीत धार्मिक कार्यक्रम झाला. कलबुर्गी जिल्ह्यातील चितापूरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंदिराशी संबंधित आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यात महिला आणि मुलांचाही समावेश होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चितापूरमधील धार्मिक कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं समोर आलं. अनेकजण मास्कशिवाय कार्यक्रमात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कर्नाटकातील कलबुर्गी हा जिल्हा करोनाचा हॉटस्पॉट घोषित झाला आहे. जिल्ह्यात करोनाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. आजच हा कार्यक्रम झालाय.
धार्मिक सोहळ्यात शेकडोंची गर्दी झाल्याची माहिती मिळताच प्रशासन हादरलं. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलंय. तसंच सरकारने चौकशीचे आदेशही दिले आहेत.

अधिक वाचा  महाराष्ट्र गुन्हेगारी रोखण्यात ३६ पैकी ३२ जिल्हे नापास; सामाजिक विकास केवळ 3 जिल्ह्यांना ५०%पेक्षा जास्त गुण