करोना व्हायरस आणि लॉकडाऊन यामुळे भारतातील आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. पण दुसरीकडे मात्र आयपीएल भरवण्याची ऑफर श्रीलंकेने भारताला दिल्याचे समजत आहे. भारतात आयपीएल कधी होईल, हे नेमके सांगता येणार नाही. पण दुसरीकडे श्रीलंकेने मात्र आयपीएलचे आयोजन करण्यासाठी समर्थता दर्शवली आहे. याबाबतचे वृत्त वायोन्यूज या संकेतस्थळाने दिले आहे.
श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शामी सिल्व्हा यांनी तेथील स्थानिक लंकादीप या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी आयपीएल २०२० आयोजित करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे म्हटले आहे. या मुलाखतीमध्ये सिल्व्हा म्हणाले की, ” श्रीलंका यंदाच्या आयपीएलचे आयोजन करू शकते. भारताने या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.”
आयपीएल जर रद्द करावी लागली, तर त्याचा मोठा फटका हा बीसीसीआय आणि संघमालकांना बसू शकतो. त्याचबरोबर खेळाडूंचाही यामुळे तोटा होऊ शकतो. सध्याच्या घडीला भारतामध्ये कधी आयपीएल होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला श्रीलंकेची ऑफर स्वीकरायची का, असा विचार बीसीसीआय करत असेल. यापूर्वी २००९ साली आयपीएल ही दक्षिण आफ्रिकेमध्ये भरवण्यात आली होती.
सिल्व्हा पुढे म्हणाले की, ” बीसीसीआयने २००९ साली भारताबाहेर आयपीएल खेळवली होती. त्यामुळे संपूर्ण स्पर्धा रद्द करण्यापेक्षा हा एक चांगला पर्याय त्यांच्यासाठी ठरू शकतो. आयपीएलचे आयोजन करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या सर्व पुरवण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळ सज्ज आहे. जर आयपीएल रद्द झाला तर बीसीसीआय आणि संघ मालकांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. पण आयपीएल रद्द न करता ती जर दुसऱ्या देशात खेळवली तर नक्कीच हे नुकसान टाळता येऊ शकते, याचा विचार बीसीसीआयने करायला हवा.”
भारतातील लॉकडाऊन वाढवल्यानंतर बीसीसीआयने अखेर यंदाची आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयकडून याबाबतचे एक पत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
केंद्र सरकारने भारतामधील लॉकडाऊन हे १४ एप्रिलपर्यंत ठेवले होते. त्यानंतर आता लॉकडाऊन हे ३ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या गव्हर्निंग कौन्सिलने आज यंदाच्या आयपीएलबाबत एक निर्णय घेतला आहे. यापुढील आदेश येईपर्यंत बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  आपत्ती व्यवस्थापन सक्रिय करा नवीन आलेल्या निष्क्रीय अधिकाऱ्यांना परत पाठवा; भाजपची आयुक्तांकडे मागणी