मुंबई : लॉकडाउन कालावधीत पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या फिरण्यावर आलेल्या बंदीचा फायदा घेत आरेमध्ये वृक्षतोड करून तिथे झोपड्या उभारण्याचे काम सुरू आहे. दहिसरलाही खारफुटीच्या जमिनीवर नव्याने झोपड्या उभारण्याचा प्रकारात वाढ झाली आहे. एकीकडे लॉकडाउनमुळे पर्यावरणाला दिलासा मिळाल्याचा आनंद व्यक्त होत असतानाच दुसरीकडे हा प्रकार सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.
आरेमध्ये युनिट नंबर १३ च्या जवळ झाडे तोडल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे प्रधान सचिव, आरेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी, महापालिका, मुंबई पोलिस आयुक्त, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक यांना वनशक्तीतर्फे पत्र लिहिण्यात आले आहे. आरेमध्ये झोपड्या बांधण्यासाठी झाडे तोडून जागा साफ केली जात असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये जीपीएस लोकेशनही टॅग करण्यात आले आहे. या फोटोंमध्ये तोडलेल्या झाडांचे बुंधे दिसत आहेत. हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रामध्ये येतो. असे असूनही या बेकायदा वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले.
आता जर याकडे दुर्लक्ष केले तर लॉकडाऊन संपेपर्यंत या ठिकाणी आणखी नव्या झोपड्या उभारण्यात येतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. युनिट १३ सोबतच फिल्टरपाडा येथेही अशाच प्रकारे वृक्ष तोडून झोपड्या बांधण्यासाठी जागा साफ करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या पाहणीबाबत प्रश्नचिन्ह
आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. राठोड यांनी यासंदर्भातील माहिती प्राप्त झाल्यानंतर आरेच्या कर्मचाऱ्यांनी युनिट नंबर १३ ला जाऊन पाहणी केल्याचे सांगितले. मात्र त्यांना तिथे तोडलेली झाडे आढळली नाहीत, असेही ते म्हणाले. यासंदर्भात जीपीएस टॅग केलेले फोटो पाठवूनही ही झाडे तोडल्याचे आरे कर्मचाऱ्यांना का दिसले नाही? तेथील झाडांचे आता बुंधेही तिथे शिल्लक नाहीत का?, असे प्रश्न यासंदर्भात आता उपस्थित होत आहेत.
दहिसरमध्येही तसाच प्रकार
आरेप्रमाणेच दहिसर येथे आयसी कॉलनीमध्ये बस पार्किंगच्या ठिकाणाजवळ आणि दहिसर पश्चिमेला खासगी रिसॉर्टच्या मागच्या बाजूला नव्या झोपड्यांचे काम सुरू झालेले आढळले आहे. खारफुटीसाठी लढणारे कार्यकर्ते हरीश पांडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालय, महापालिका, खारफुटी कक्ष, मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे ट्विटरवरून तक्रार केली आहे. तसेच आमदार मनीषा चौधरी, एमएचबी पोलिस ठाणे यांच्याशीही संपर्क साधलेला आहे. लॉकडाउनमुळे या सगळ्या घटनांवर नजर ठेवता येत नाही. घरातून बाहेर पडणे कठीण झाल्याने खारफुटीची कत्तल करणाऱ्यांचा धुडगूस वाढला आहे असे पांडे यांनी सांगितले. मनीषा चौधरी यांनी यासंबंधी वनविभागाशी चर्चा करून त्यांना कारवाईची विनंती केल्याचे सांगितले.
खारफुटी विभागाचे पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी शरण देशपांडे यांनी हा भाग महसूलच्या ताब्यात असून संबंधित अधिकारी तसेच तहसीलदारांनाही याची कल्पना दिल्याचे स्पष्ट केले. यासाठी महसूलकडून कारवाई अपेक्षित आहे. मात्र तक्रारीनंतर दहिसर पश्चिमेला जिथे खारफुटीची कत्तल झाली आहे, तिथे जाऊन झोपडी बांधणाऱ्या व्यक्तीला गुरुवारी समज दिल्याचीही माहिती त्यांनी दिली. तहसीलदार विनोद धोत्रे यांनी या संपूर्ण प्रकरणी महापालिका आणि पोलिसांची मदत गरजेची असल्याने लॉकडाउननंतर ही कारवाई करता येईल असे सांगितले. तसेच हे बांधकाम आधीच्याच झोपड्यांच्या बाजूला होत असल्याने सध्या तरी यात आणखी खारफुटीची कत्तल होण्याची भीती यात नाही असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार? रामराजे निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करणार?