बीड : लॉकडाऊनमुळे बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातले तब्बल दीड लाख ऊसतोड मजूर अडकून पडले आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हे मजूर अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे काम बंद झालं, त्यांची कमाई बंद झाली त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. इथे राहून आम्ही करायचं तरी काय? आता गोळ्या घातल्यातरी आम्ही इथे राहू शकत नाही लहान मूलं गावाकडे आहेत ती उपाशी मरत आहेत, इथे आम्हला दिलेलं रेशन संपले, जनावरं उपाशी मरत आहेत, रात्री पावसाने सगळी पाल उडून गेली, उघडयावर अलोत त्यामुळं गावाकडे जाऊ, भलेही पोलिसांनी रस्त्यात गोळ्या घेतल्या तरी आता आम्ही थांबू शकत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. कारखाना बंद होऊन 15,20 दिवस झाले आहेत. आमचं काही झालं तर त्याला जबाबदार कोण असा सवालंही त्यांनी केला.
बीड जिल्हयातील 3000 ऊसतोड मजूर सांगली जिल्हयातील पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाना कडेगाव येथे 20 दिवसांपासून अडकून पडले आहेत.पंकजा मुंडे यांनी 14 तारखेपर्यंत थांबा म्हणून विनंती केली होती, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. गावाकडे आमची लहान मूलं आणि वयोवृद्ध माणसं वाट पाहत आहेत.
त्यांच्या भाकरी पाण्याची अडचण आहे. इथे जनावर उपाशी आहेत, आम्ही कसं बसं खात होतो, रात्री पाऊस झाला सगळं भिजून गेलं, आता गावाकडे जायचं ठरवलं आहे, आता आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
एक महिला म्हणाली, माझा लहान मुलगा गावाकडे आहे घरी फक्त म्हातारा आणि म्हातारी आहेत त्यांच्या खाण्या पाण्याची आणि जेवणाची अडचण होत आहे. त्यामुळे मी इथे थांबू शकत नाही. काही झालं तरी चालेल पोलिसांनी मारले तरी चालेल मात्र मी गावाकडे गेल्याशिवाय राहणार नाही असे म्हणतांना ऊसतोड मजूर महिलेच्या डोळ्यात पाणी आलं. या मजुरांना समजावयाचं तरी कसं? असा प्रश्न या मजुरांना पडला आहे.