बीजिंग: करोनाविरोधात लढण्यासाठी चीनने भारताला वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा सुरू केला आहे. गुरुवारी चीनने भारतासाठी ६ लाख ५० हजार मेडिकल किट्स पाठवले आहेत. त्याशिवाय करोनाची चाचणी करण्यासाठीचे किट्स आगामी १५ दिवसांत भारतात दाखल होणार आहे. चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्त्री यांनी ट्विट करून याबाबत ही माहिती दिली आहे. रॅपिड अॅण्टी बॉडी टेस्ट्स आणि आरएनए एक्सट्रॅक्शन किट्ससह एकूण साडे सहा लाख किट्स ग्वांग्झू विमानतळावरून भारतासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. करोना संसर्गाशी जवळपास अडीच महिने सामना केल्यानंतर चीनमध्ये उद्योग, कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे सध्या चीनमध्ये जगातील इतर देशांमधून व्हेंटिलेटर, पीपीईसह इतर साहित्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.
भारतातील सर्वाधिक करोनाबाधित भागांमध्ये लवकर वैद्यकीय तपासणी व्हावी यासाठी करोना चाचणीच्या किट्सचे मोठ्या प्रमाणावर पाठवले आहेत. चीनमधून या वैद्यकीय वस्तूंना भारतात वेळेवर पोहचवण्यासाठी भारतीय दूतावासाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहेत.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातही शांतता रॅली;२५ लाखांहून अधिक मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता