नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी परिचारिका, डॉक्टर आणि पोलीस प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. राज्यात 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. याच दरम्यान राज्यात विविध उपक्रमांद्वारे गरिब आणि मजुरांपर्यंत अन्न पोहोचवण्याचं काम केलं जात असतानाच नागपुरात मनपा आयुक्त तुकाराम मुढेंनीही अनोखी मोहीम हाती घेतली आहे. बेघर आणि निराधारांना आधार देण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या निवारा केंद्राचा मोठा आधार दिला आहे. निवारा केंद्र ही संकल्पना त्यांनी मांडली आणि प्रत्यक्षात उतरवली सुद्धा. बेसहारा असणाऱ्या रस्त्यावर, फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना या निवारा केंद्रामध्ये आणण्यात आलं.
महापालिकेचं हे निवारा केंद्र या सर्व लोकांच्या स्वच्छतेची काळजी घेतं. इथल्या कर्मचाऱ्यांनी आणि वॉलेंटियर्सनी मिळून बेघर असणाऱ्यांचा पूर्ण लूक बदलला आहे. त्यांना स्वच्छ करून नवे कपडे दिले आहेत. या सर्वांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चांगलं काम करता यावं यासाठी सक्षम करण्याचा नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे करत आहेत.
सर्वांना पहिल्यांदा निवारा केंद्रात येण्याआधी त्यांचा मेकओव्हर करण्यात आला.केस कापण्यात आले, त्यांना आंघोळ करून स्वच्छ नवीन कपडे वापरायला देण्यात आले. नागपुरातील वेगवेगळ्या भागांतील 20 बेघर निवाऱ्यात 1252 जणांनी आसरा घेतला आहे. या सर्वांना महापालिकेकडून चहा, नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणाची सोय केली जाते. तुकाराम मुंढेंच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या मोहीमेचं नागपुरातच नाही तर राज्यात कौतुक होत आहे.

अधिक वाचा  आता खेळले नाहीत तर फरक पडणार;बीसीसीआय कामगिरीनुसार पैसे देणार! रोहित-विराटही नाही वाचणार