पालघर : एका अफवेमुळे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गावात कार चालकांसह 2 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. काही दिवसांपासून गावात दरोडेखोर आणि चोर फिरत आहेत अशी अफवा पसरली होती. त्यामुळे ग्रामस्थ फार संतापले होते. कांदिवलीहून सूरतला निघालेल्या प्रवाशांची पालघरमध्ये दगडाने आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आली. एकीकडे पालघरमध्ये कोरोनाचं संकट वाढत आहे. देशभरात लॉकडाऊनचं काटेकोरपणे पाळण्याचे आदेश दिले असताना एका चुकीच्या अफवेमुळे तीन जणांची हत्या करण्यात आली.
चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोर किंवा दरोडेखोर नाही तर तबलिगी जमातचे लोक गावात येत असल्याची ही अफवा पसरली होती. आधीच कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे त्यामध्ये निजामुद्दीनहून आलेल्या तबलिगी जमातचे अनेक लोक लपून बसल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी भीती आणि रागातून या प्रवाशांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले तेव्हा त्यांच्यावरही संतप्त जमावानं हल्ला केला. पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि हल्ला केला. यामध्ये 4 ते 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 40 जणांना ताब्यात घेतलं आहे. पालघर जिल्ह्यातील दुर्घटना घडलेल्या गावाला छावणाचं रुप देण्यात आलं आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अधिक वाचा  वंदे भारतवर दगडफेक का केली? तरुणाने केले धक्कादायक खुलासे ‘ट्रेनचा वेग कमी होताच…’