मुंबई: करोनाच्या विषाणूशी शर्थीची झुंज देणाऱ्या राज्य सरकारला दिलासा देणारी बातमी आहे. काल रात्रीपासून आतापर्यंत करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये फक्त ३४ नं वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे. नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. ही संख्या २३ आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाची चिंता वाढवणाऱ्या मुंबईतील संसर्ग हळूहळू कमी होत असल्याचं चित्र आहे. काल रात्रीपासून आतापर्यंत मुंबईत फक्त सहा नवे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रातील करोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात ४ जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर, ठाण्यात एक बाधित आढळून आला आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३२३६ झाली आहे.
मुंबईनंतर करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या पुण्यात आहे. मुंबईत रुग्णवाढ घटत असताना पुण्यात तसं काही दिसत नसल्यानं चिंता वाढली आहे. तिथं मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. आतापर्यंत तिथं ४८ रुग्ण दगावले आहेत. त्यातील एकट्या ससून रुग्णालयात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच ससूनमध्ये एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत समूह संसर्ग नाही!
मुंबईत करोना रुग्णांची संख्या दोन हजाराच्यावर गेली असली तरी मुंबई समूह संसर्गाच्या टप्प्यात गेली नसल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. करोनाची लक्षणं असलेल्या नागरिकांवर तातडीनं उपचार करण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी ‘फिव्हर क्लिनिक’ सुरू केले आहेत. तिथं येणाऱ्या रुग्णसंख्येच्या आधारावर महापालिकेनं हा दावा केला आहे.