परभणी: महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत असताना, ग्रीन झोनमध्ये असलेल्या परभणी जिल्ह्यात आज, गुरुवारी करोनाचा पहिलाच रुग्ण आढळला. त्यामुळं खळबळ उडाली आहे. हा करोनाबाधित तरूण पुण्याहून पायी परभणीत आला होता. हा २१ वर्षीय तरूण परभणी शहरातील एमआयडीसी परिसरात राहत होता.
राज्यातील ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात परभणीचा समावेश होता. जिल्हा, आरोग्य प्रशासन व पोलीस प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन जिल्ह्याला एक आरोग्यकवच तयार केले होते. परंतु पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यांतून मजूर परत आपल्या जिल्ह्यात घुसण्यासाठी या ना त्या मार्गाचा अवलंब करत आहेत. ही बाब वेळोवेळी उघड झाली आहे. प्रशासनाला चकवा देत परभणी शहरातील एमआयडीसी परिसरात राहत असलेला एक रुग्ण करोनाबाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
या तरुणाने पुण्यावरून पायी प्रवास करत ११ तारखेला परभणीत शहरात प्रवेश केला असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. १३ एप्रिल रोजी हा तरुण सर्दी, खोकल्याने जास्त आजारी पडल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. आरोग्य विभागाला या तरुणाची लक्षणे करोना संसर्गासारखी असल्याने त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवले. त्याचा अहवाल गुरूवारी (१६ एप्रिल) सकाळी अकरा वाजता प्राप्त झाले. दरम्यान अहवालात सदर तरुण करोना पॉझिटिव्ह असल्याचे नमूद केले आहे. अहवाल गुरूवारी प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या रुग्णाची स्वतंत्र अशी व्यवस्था केली असून, त्याला देखरेखीखाली ठेवलं आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
एमआयडीसी परिसर सील
जिल्ह्यातील करोनाचा पहिला रुग्ण शहरातील एमआयडीसी परिसरात आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खबरदारी घेतली जात आहे. ज्या परिसरात हा रुग्ण आढळला आहे. तो संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान ‘त्या’ २१ वर्षीय युवकाच्या कुटुंबीयांची तपासणी होणार असल्याची माहिती हाती आली असून, या संदर्भात आरोग्य विभागाने अधिक तपशील दिला नाही.

अधिक वाचा  अंकिता वालावलकर हिच्यावर भडकले सूरज चव्हाणचे चाहते, बिग बॉसच्या घरात सूरजसोबत हैराण करणारा प्रकार आणि…