मुंबई: वांद्रे येथे मजुरांच्या उद्रेकाला जबाबदार असलेला विनय दुबे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य नाही. त्याचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. वांद्रे येथे गावाकडे जाण्यासाठी हजारो मजूर जमले होते. या घटनेला विनय दुबे जबाबदार असल्याचं उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

त्यानंतर तो राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी हा खुलासा केला आहे. विनय दुबे हा राष्ट्रवादीशी संबंधित असल्याच्या बातम्या येत आहेत. राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्यासाठीच अशा पद्धतीने बातम्या पेरण्यात आल्या असून हा प्रकार दुर्देवी आहे. दुबेचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, दुबेने २०१२मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर उत्तर वाराणासीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती. तर २०१९मध्ये त्याने कल्याणमधून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. वांद्रे प्रकरणानंतर दुबेला नवी मुंबई पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतले होते. फेसबुक आणि सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्टबाबत त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विनय दुबे हा उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्याचा रहिवासी आहे. गेल्या काही वर्षात तो गावाकडेही गेला नव्हता.

अधिक वाचा  सरकारशी सकारात्मक चर्चा, कोणत्या मुद्यांवर सहमती; आज शेतकरी मोर्चा होल्डवर ?