नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसवर (CoronaVirus) सध्या ना कोणतं औषध, ना लस. सध्या सरकारनं या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र यामुळे आपण व्हायरसचा पूर्णपणे नाश होईल असं नाही, त्यामुळे देशातील काही जवळपास 60 टक्के लोकांना संक्रमित होऊन व्हायरसविरोधात प्रतिकारक शक्ती विकसित करावी लागेल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
भारतातील एपिडेमोलॉजिस्ट (Epidemiologist) डॉ. जयप्रकाश मुलियिल म्हणाले, कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी हर्ड इम्युनिटी (Herd Immunity) हा आता एकमेव मार्ग आहे. CNBC TV 18 शी त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. जयप्रकाश मुलियिल यांनी सांगितलं, “लॉकडाऊनमुळे आपण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण मिळवू शकतो. मात्र हा लॉकडाऊन तरी कधीपर्यंत शक्य आहे. कधी ना कधी तो संपवावा लागेल आणि व्हायरस पुन्हा डोकं वर काढू शकतो.”
“अशात ज्या तरुण वर्गाला या व्हायरसचा धोका कमी आहे, त्याने या व्हायरसला सामोरं जायला हवं, जेणेकरून त्यांच्यामध्ये या व्हायरसविरोधात प्रतिकार शक्ती निर्माण होईल. अशा जवळपास 60 लोकांना कदाचित संक्रमित व्हावं लागू शकतं, जास्तीत जास्त लोकसंख्या संक्रमित होऊन व्हायरसविरोधात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण करेल आणि ज्या इतर लोकांना याचा धोका जास्त आहे. त्यांचं संरक्षण करेल”, असं ते म्हणाले.
“हे थोडं जोखमीचं आहे, कारण या व्हायरसवर अद्याप उपचार नाहीत. त्यासाठी आरोग्यव्यवस्था मजबूत असायला हवी. जेणेकरून त्यांच्यावर उपचार होतील. तर दुसरीकडे वयस्कर लोकं, लहान मुलं अशांना फक्त या व्यक्तीपासून दूर ठेवण्याचीही गरज आहे. स्वाईन फ्लूवरही याच पद्धतीने नियंत्रण आणण्यात आलं होतं.”, असं डॉ. मुलियिल यांनी सांगितलं.