सातारा: शासनाच्या निकषाप्रमाणे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या सर्वच नागरिकांना ज्याप्रमाणे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तोच सरकारी निकष सध्या पाचगणी येथे ठेवण्यात आलेल्या वाधवान कुटुंबीयांसह २३ जणांना लावण्यात आला आहे. यामुळे कायद्यापुढे सगळे समान असतात अशीच जाणीव वाधवान कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने करून दिली आहे. दरम्यान, वाधवान कुटुंब लोणावळ्यात नाव बदलून वास्तव्य करत होतं, अशी माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे.
येस बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात जामिनावर असलेले उद्योगपती कपिल वाधवान व त्यांच्यासोबत आलेले २२ जण असे एकूण २३ जण सध्या पाचगणी येथे आहेत. जिल्हा बंदी आदेशाचे उल्लेख उल्लंघन करून खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास या सर्वांनी ८ एप्रिल रोजी केला होता. या प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलीस ठाण्यात २३ जणांवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या २३ जणांना मागील सोमवारपासून पाचगणी येथील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या इमारतीत इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. वाधवान कुटुंबीयांना सध्या जेवणात डाळ, भात आणि आमटी देण्यात येत आहे. एकूण १४ दिवस या कुटुंबाला असाच सरकारी पाहुणचार घ्यावा लागणार आहे.
दरम्यान, लोणावळ्यात वाधवान कुटुंबीय आपले नाव बदलून वास्तव्यास होते अशी माहिती तपास पथकाला मिळाली आहे. वाधवान कुटुंबांच्या प्रवासाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी महाबळेश्वर पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या नेतृत्वाखालील पथक नुकतेच लोणावळा येथे गेले होते. त्यांच्या चौकशीची एक फेरी पूर्ण झाली आहे. या चौकशीत वरील माहिली मिळाली आहे. याबाबत सविस्तर माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस वाधवान कुटुंबाचीही चौकशी करणार आहे. सध्या हे कुटुंब क्वारंटाइनमध्ये असल्याने २३ एप्रिलपर्यंत पोलिसांना वाट पाहावी लागणार आहे. लोणावळ्याजवळील तुंगार्ली पीकॉक व्हॅली या सोसायटीत दोन बंगले वाधवान कुटुंबाने भाडेतत्वावर घेतले होते. हे दोन्ही बंगले मुंबईच्या एका धनिकाचे आहेत. या ठिकाणी असलेल्या केअरटेकरची चौकशी पोलीस पथकाने केल्यावर हा नाव बदलाबाबतचा प्रकार उघडकीला आल्याचे सूत्रांनी सांगितले.