पुणे: पुण्यात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर खूपच जास्त आहे. राज्यात पुणे आणि मुंबईत सर्वाधिक कोरोनारुग्ण आढळले आहेत. याच दोन्ही महापालिका आणि आसपासच्या परिसरात सर्वाधिक मृत्यूही झाले आहेत. पण कोरोनाबाधितांची संख्या विचारात घेतली, तर Coronavirus चं सर्वात उग्र रूप सध्या पुण्यात दिसत आहे. आज पुण्यात दिवसभरात 44 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
14 एप्रिलला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात आतापर्यंत 310 कोरोनारुग्ण सापडले आहेत आणि या शहरात 34 बळी गेले आहेत. याचा अर्थ पुण्यात कोरोनाचा मृत्यूदर 10 टक्क्यांच्या पुढे आहे. कोरोनाचं सर्वात भीषण रूप पाहिलेल्या इटलीएवढा हा मृत्यूदर दोन दिवसांपूर्वी पुण्यात होता. तो आता थोडा कमी होऊन 10 टक्क्यांच्या आसपास आला आहे.
इटलीसारखी भयंकर?
जगभरात इटलीने आतापर्यंत कोरोनाव्हायरसचं सर्वाधिक भयंकर रूप पाहिलं आहे. चीनमध्ये सुरू झालेली ही साथ त्या देशाला मात्र 3 टक्के मृत्युदरापर्यंत रोखता आली. इटलीत कोरोनाचा मृत्यूदर 12 टक्के आहे. स्पेनमध्ये हा दर 10 टक्के आहे. म्हणजे प्रत्येक 100 कोरोनाबाधित व्यक्तींपैकी 10 जणांचा मृत्यू होत आहे.
फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये ही संख्या 10 टक्क्यांच्या जवळ जात आहे. इटलीतल्या लोम्बार्डी शहरात या विषाणूनं थैमान घातलं आहे. तिथला मृत्यूदर 18 टक्क्यांच्या आसपास आहे. न्यूयॉर्कमध्येही मृत्यूदर वाढत असून तो 5 टक्क्यांच्या आसपास आहे.
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार 14 एप्रिलपर्यंत 2684 कोरोनाग्रस्त राज्यभरात दाखल झाले आहेत. त्यापैकी 178 जणांना या साथीने बळी घेतला आहे. एकट्या मुंबईत 1756 कोरोनारुग्ण आहेत आणि शहरात 112 मृत्यू झाले आहेत. हा मृत्यूदरसुद्धा 6 टक्क्यांच्या वर म्हणजे देशाच्या तुलनेत खूप जास्त आहे. संपूर्ण देशाचा विचार केला, तर मृत्यूदर तीन टक्क्यांहून थोडा जास्त आहे. भारतात आतापर्यंत 353 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आणि देशात 10,815कोरोनाग्रस्त नोंदले गेले आहेत.
मध्य प्रदेशातल्या इंदौरमध्ये कोरोनाचा मृत्यूदर जास्त आहे.
पुण्यात काय आहे कारण?
पुण्यात कोरोनारुग्णांची संख्या मुंबईच्या तुलनेत कमी वाढताना दिसते. पण मृत्यूचं प्रमाण मात्र गेल्या दोन दिवसात प्रचंड वाढलं आहे. कदाचित कोरोना चाचणीचं प्रमाण शहरात कमी असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण फार आढळत नसावेत, हेही कारण वाढत्या मृत्युदरामागे असू शकतं. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी सांगितलं की, सध्या अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये फ्लूची (Flu) लक्षणे आढळून येत आहे. मात्र नागरिक त्यावर घरगुती उपचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अशा प्रकारे स्वयं उपचार करणे धोक्याचे आहे. या घरगुती उपचारांमुळे काही काळासाठी बरं वाटतं मात्र पुन्हा त्रास सुरू होते आणि त्यानंतर नागरिक रुग्णालयात भर्ती होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकजण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. “पुण्यातील कोरोनाबाधित व मृत्यूंच्या संख्येवर नियंत्रण आणायचे असल्यास वेळीत उपचार करणे आवश्यक आहे. आजार अंगावर काढला तर पुढे जाऊन अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे सर्व पुणेकरांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी असं करू नये आणि वेळीत उपचार घ्यावा. घरगुती उपचार करू नये”, असं आवाहन सांगितलं आहे.