पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुटख्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन असतानादेखील प्रशासनाची दिशाभूल करत पुणे-सोलापूर महामार्गावर तेलंगणा ते मुंबई अशी वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकास दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावर ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये 22 लाख 27 हजारांच्या गुटख्यासह 32.27 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
प्रशासनाची दिशाभूल करून फसवणूक करत वाहतूक केल्याने फसवणुकीसह इतर कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावर पोलीस पेट्रोलिंग करत असताना वाहने चेकिंगच्या वेळी आयशर टेम्पो चालकाच्या हलचालीबाबत पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन विचारपूस केली असता टेम्पो चालक हा गाडीत बिस्कीटाच्या नावाखाली चक्क गुटखा वाहतूक करत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले.
तेलंगणा येथून पुण्याच्या दिशेने हा टेम्पो निघाला होता. या टेम्पोच्या समोरील काचेवर अत्यावश्यक सेवा असा छापील बोर्ड लावण्यात आला होता. यामध्ये मानसिंग खुदहरण सिंग कुशवाह रा.उत्तर प्रदेश ,शिलदेव कृष्ण रेड्डी रा.सिकंदराबाद, हैदराबाद यांच्यावर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुटख्यासह 32.27 लाखांचा माल यामध्ये जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करत आहेत.

अधिक वाचा  बिग बॉसच्या घरात सगळ्यांना गुलीगत धोका