पुणे : पावसाळ्याच्या कालावधीत शहरात प्रस्तावित असलेल्या पावसाळापूर्व कामांना महापालिके कडून सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कात्रज तलावाच्या भिंतीवरून पाणी वाहिल्यामुळे आंबिल ओढय़ाला पूर येऊन शहरात वाताहत झाली होती. त्यामुळे कात्रज तलावातील पाणी नलिकेद्वारे उपसण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय तलाव स्वच्छतेची कामेही महापालिके कडून करण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओढय़ाला पूर आला होता. मात्र कात्रज तलावाच्या भिंतीवरून पाणी मोठय़ा प्रमाणावर वाहत असल्यामुळे ते पाणी आंबिल ओढय़ात आल्याचे आणि त्यातून शहराच्या तेरा किलोमीटर अंतराच्या भागात हाहाकार उडाल्याचे पुढे आले होते. त्यामुळे यंदा खबरदारी म्हणून कात्रज तलावापासूनच पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
कात्रज तलावातील पाण्याची पातळी एकसमान राखणे, तलावातील जलपर्णी आणि अन्य गाळा, राडारोडा काढणे अशी कामे महापालिके च्या मुख्य खात्याकडून सुरू करण्यात आली आहेत. येत्या दोन महिन्यात ही सर्व कामे होणार आहेत. आंबिल ओढय़ासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी कात्रज तलावापासून पावसाळापूर्वीची अत्यावश्यक कामे सुरू करण्यात आली आहेत. कात्रज तलावाला सांडवा नसल्यामुळे भिंतीवरून पाणी वाहण्याचे प्रकार होतात. त्यामुळे वक्र नलिके द्वारे पाणी उपसण्यात येत आहे. तलावाची पाणी पातळी किमान ठेवली जाणार आहे, असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील नाले सफाईच्या कामांबाबतचे नियोजनही महापालिका मुख्य खात्याकडून करण्यात आले आहे. शहरातील नाल्यांची संख्या लक्षात घेता परिमंडळ निहाय हे नियोजन करण्यात आले आहे. नाल्यांवरील अतिक्रमणांसंदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार असून धोकादायक ठिकाणेही शोधण्यात येणार आहेत. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन यंदा पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईची शंभर टक्के कामे पूर्ण करण्याची सूचना आयुक्तांनी के ली आहे. मुख्य खात्याकडूनही बृहत आराखडा करण्यात आला असून नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडील अभियंता व अन्य कर्मचारी या कामासाठी वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.