वांद्रे येथे परप्रांतीयांची गर्दी गोळा करत लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे याला अटक केली आहे. विनय दुबे याने परप्रातीयांना भडकवणारा व्हिडीओ शेअर करत आंदोलन पुकारण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करत ऐरोली येथून त्याला ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांच्या हवाली केलं. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर विनय दुबे याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतचे काही फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो विनय दुबेच्या फेसबुक अकाऊंटलादेखील आहेत. विनय दुबे याचा मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी दांडगा जनसंपर्क असून तो उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांनी आपली उत्तर भारतीय विरोधी भूमिका थोडीशी मवाळ केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित केलं होतं. डिसेंबर २०१८ मध्ये पार पडलेल्या या मेळाव्याचं संयोजक इतर कोणी नाही तर विनय दुबे हाच होता. विनय दुबे याच्या फेसबुक अकाऊंटवर स्टेजवर राज ठाकरेंसोबत उपस्थित असतानाचे फोटो आहेत.
इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानीदेखील काढलेला एक फोटो विनय दुबेने शेअर केलेला दिसत आहे. विनय दुबे लोकसभा निडणुकील कल्याण मतदारसंघातून अपक्ष म्हणून मैदानात उतरला होता. राज ठाकरेंसोबत कार्यक्रमात उपस्थित असल्याने आपल्याला मनसे समर्थक पाठिंबा देतील असा विश्वास त्याला होता. पण निवडणुकीत शिवसेनेच्या डॉक्टर श्रीकांत शिदे यांनी त्याचा पराभव केला.
देशात बुधवारी संपणाऱ्या लॉकडाउनमध्ये वाढ झाल्याने संयम सुटलेल्या उत्तर भारतीय कामगारांनी मंगळवारी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर आपआपल्या गावाला जाण्यासाठी गर्दी केली. यामुळे प्रशासन आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गाड्या सुरूही झाली नसताना शहरातील अंतर्गत वाहतूक बंद असतानाही ही गर्दी झाली कशी? या प्रश्नाचा शोध घेत असता पोलीस उत्तर भारतीय महापंचायत संघटनेचा अध्यक्ष विनय दुबेपर्यंत पोहोचले. त्याने फेसबुकवर आंदोलनाची हाक दिली होती.
विनय दुबेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विनय दुबे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनविरोधात परप्रातीयांना भडकवत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ फेसबुकवर शनिवारी अपलोड करण्यात आला होता.
व्हिडीओत विनय दुबे परप्रांतीयांना सोबत घेऊन आपण उत्तर प्रदेशपर्यंत पदयात्रा काढणार असल्याचं सांगत आहे. यावेळी त्याने आपल्याला पाठिंबा असणाऱ्यांना व्हॉट्सअपला मेजेस टाकावा असं आवाहन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा यावेळी त्याने विरोध केला. जर हे प्रकरण १४-१५ पर्यंत मिटलं नाही तर २० एप्रिलला पदयात्रेला सुरुवात करुन अशी धमकी त्याने व्हिडीओत दिली होती.
भुकेने मरण्यापेक्षा व्हायरसने मेलेलं चांगलं असंही वारंवार तो व्हिडीओत बोलताना दिसत आहे. या सगळ्यासाठी त्याने राज्य आणि केंद्र सरकारला जबाबदार ठरवलं आहे. १४ एप्रिल रोजी युट्यूबवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओत विनय दुबे परप्रांतीयांना रस्त्यावर उतरा आणि लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ एकत्र या असं आवाहन करत आहे. फक्त मुंबई नाही तर देशभरातील लोकांना त्यांनी रेल्वे स्थानकांजवळ एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. रस्त्यावर लाखोंच्या संख्येने उतरुन केंद्र आणि राज्य सरकारांविरोधात एका आंदोलनाला सुरुवात करा असं आवाहन त्याने केलं होतं.