करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली. मात्र या लॉकडाउनचा फटका बसलेल्या परप्रांतातील मजुरांनी मंगळवारी संध्याकाळी वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. गावी जाण्यासाठी विशेष गाडी सोडा असं म्हणत सर्व कामगारांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियमही मोडले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर राजकारणाचा खेळ सुरु झाला आहे.
घडलेल्या प्रकारावरुन भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राज्य सरकारला दोषी ठरत, सरकार गरीब कामगारांकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं. संबित पात्रांनी केलेल्या या ट्विटला आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी परखडपणे उत्तर देत, केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये वाढ करताना थोडं आधी सांगायला हवं होतं. गरीबांचा विचार करण्यास केंद्र सरकार अपयशी ठरतंय, म्हणूनच मुंबईत सध्या अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं मेनन यांनी सुनावलं.
या सगळ्या जमावामध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार या ठिकाणी जमले होते. लांब पल्ल्याची गाडी सोडा अशी मागणी या सगळ्या कामगारांनी आणि मजूर वर्गाने केली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत हा सगळा जमाव पांगवला आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्यांची समजूत काढली. वांद्रे पश्चिम या ठिकाणी ही घटना घडली. वांद्रे बेस्ट बस डेपोजवळ अनेक लहान मोठे कारखाने आणि फर्निचरची दुकानं आहेत. या दुकानांमध्ये काम करणारे मजूर आणि कामगार हे गावी जाण्यासाठी या ठिकाणी जमले होते.

अधिक वाचा  शिवशाही प्रतिष्ठान तर्फे गणेश मंडळांना “जास्वंद रोप” सन्मान