देशावर असलेल्या करोनाचं सावट पाहता लॉकडाउनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या काळात रेल्वे प्रशासनानेदेखील ३ मेपर्यंत गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वांद्रे पश्चिम येथे हजारोंच्या जमावाने हा लॉकडाउन झुगारुन वांद्रे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या प्रकरणावर सध्या मुंबईतील वातावरण तापलं असून ‘कोणत्याही अफवांना बळी पडू नका’, असं वारंवार सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यानेदेखील त्याची भूमिका मांडत लोकांना आवाहन केलं आहे.
लॉकडाउन संपून आपल्या गावी परत जाता येईल, या आशेवर गेल्या महिन्याभरापासून शहरात अडकलेल्या हजारो मजुरांच्या अस्वस्थतेचा उद्रेक मंगळवारी वांद्रे स्थानकावर झाला. या नागरिकांमध्ये ट्रेन सुरु झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे या नागरिकांनी मोठ्या संख्येने वांद्रे स्थानकावर गर्दी केली. या घटनेनंतर अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असून अभिनेता प्रवीण तरडेदेखील व्यक्त झाला आहे. ‘देशाचा सगळ्यात मोठा शत्रू करोना नसून अफवा पसरविणारे आहेत’, असं ट्विट करत त्याने त्याचं मत मांडलं आहे.
‘देशाचा सगळ्यात मोठा शत्रु कोरोना नाही तर अफवा पसरवणारी भूतं आहेत .. त्यांच्या पासून लांब राहा’,असं ट्विट प्रवीण तरडे यांनी करत अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?
ट्रेन सुरु होणार असल्याची अफवा नागरिकांमध्ये पसरली होती. त्यामुळे हजारोंच्या जमावाने वांद्रे स्थानकात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. लॉकडाउन जरी वाढविला असला तरीदेखील ट्रेन सुरु होतील या आशेमुळे हजारो जण वांद्रे स्थानकावर जमा झाले होते. परिणामी, हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

अधिक वाचा  15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?