“वांद्रे रेल्वे स्टेशनवर काल जे घडलं, तसं पुन्हा घडता कामा नये. यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. वांद्रयातून रेल्वे सुटणार असं सांगण्यात आल्यामुळे लोक मोठया संख्येने तिथे जमले होते. पुन्हा अशा गोष्टी घडू नयेत यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना एक विनंती सुद्धा केली. “राजकीय संघर्ष आपण नेहमी करत असतो. त्यात चुकीचं काही नाही. लोकशाहीमध्ये हे सुरु असतं. पण सध्या आपल्या देशावर संकट आहे. संकटाच्या काळात राजकारण नको, करोनाचा पराभव करणे हाच सर्वांचा एककलमी कार्यक्रम असला पाहिजे” असे शरद पवार म्हणाले.
उद्योजकांना पैसा उपलब्ध करुन दिला पाहिजे. अर्थव्यवस्थेसाठी विशेष प्रयत्न गरजेचे आहेत. बेरोजगारी संकट येऊ घातलयं, त्याच प्रमाण वाढेल. करोनाचे परिणाम वर्षभर जाणवू शकतात असे शरद पवार म्हणाले. वयोवृद्ध लोकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. करोनाचा वाढता प्रसार चिंताजनक आहे. भारतात करोनामुळे मृत्यू झालेल्यांना इतरही आजार होते असे शरद पवार म्हणाले.

अधिक वाचा  अधिवेशनाआधी सर्वात मोठी बातमी : मराठा समाजाला इतके टक्के आरक्षण मिळणार