वॉशिंग्टन: एका बाजूला करोनाच्या संसर्गाशी लढत असताना अमेरिका भारताला शस्त्र विक्री करणार आहे. सोमवारी ट्रम्प प्रशासनाने याबाबत अमेरिकेच्या संसदेला माहिती दिली आहे. अमेरिका भारताला १५५ मिलियन डॉलरच्या करारात हार्पून ब्लॉक २ एअर लाँच मिसाइल आणि टॉरपीडो देणार आहे.
अमेरिका-भारतात झालेल्या करारानुसार, अमेरिका भारताला १० एजीएम-८४एल हार्पून एअर लाँच क्षेपणास्त्रे ९२ मिलियन डॉलरच्या किंमतीत देणार आहेत. तर, एमएल ५४ राउंड टॉरपीडो-३ एमके ५४ एक्ससाइज टॉरपीडो ६४ मिलियन डॉलर किंमतीवर देणार आहेत. भारत सरकारने याबाबतची मागणी केली होती. त्याला आता अमेरिकेने मंजूरी दिली असल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे.
पेंटागॉनच्या सूत्रांनुसार, हार्पून क्षेपणास्त्रांच्या मदतीने समुद्र क्षेत्रातील सुरक्षितेला वाढवता येऊ शकते. अमेरिकेकडून याचा वापर केला जातो. भारत याचा वापर आपल्या हद्दीतील संकटाशी मुकाबला करण्यासाठी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
भारताला देण्यात येणारी हार्पून क्षेपणास्त्रांची निर्मिती बोईंग कंपनी करणार आहे. तर, टॉरपीडोची निर्मिती रेथिथॉन कंपनी करणार आहे. मागील अनेक वर्षांपासून भारत-अमेरिकेत चांगले संबंध आहेत. सुरक्षितेच्या दृष्टीने दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होणार असल्याचे पेंटागॉनने म्हटले आहे.