मुंबई: भीमा कोरेगाव हिंसा आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातजावई डॉ. आनंद तेलतुंबडे आणि नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी आज एनआयएसमोर शरणागती पत्करली. आंबेडकर जयंती दिनीच आंबेडकरांच्या नातजावयाला अटक करण्यात आल्याने आंबेडकरी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने डॉ. आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना आठवड्याच्या आत तुरुंग प्रशासनाला शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे तेलतुंबडे आणि नवलखा आज एनआयएच्या कार्यालयात उपस्थित झाले. त्यानंतर या दोघांनाही एनआयएकडून ताब्यात घेण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, आमदार कपिल पाटील, तेलतुंबडे यांच्या पत्नी रमा तेलतुंबडे, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आदी तेलतुंबडे यांच्यासोबत एनआयए कार्यालयापर्यंत आले होते. यावेळी कोणतीही गर्दी करण्यात आली नव्हती.
दरम्यान, तेलतुंबडे यांच्या अटकेवर आंबेडकरी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बाबासाहेबांच्या जयंती दिनीच त्यांचे नातजावई व आंबेडकरी विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक करणे हा षड्यंत्राचाच भाग आहे. त्याचा एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी तीव्र शब्दात निषेध करीत आहे. अवघा आंबेडकरी समाज आपल्या उद्धारकर्त्याच्या जन्मदिनी जल्लोष करत असताना एका आंबेडकरी विचारवंतला अंधाराच्या खाईत ढकलणे हा अक्षम्य गुन्हा आहे, अशा शब्दात ज्येष्ठ विचारवंत, भारिपचे नेते ज. वि. पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेत या दोघांनी चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोपा होता. या भाषणांमुळे कोरेगाव-भीमा गावात जातीय दंगल उसळल्याच्या आरोपांखाली पुणे पोलिसांनी या दोघांवर गुन्हा नोंदवला आहे. या दोघांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचा दावाही पुणे पोलिसांनी केला आहे. या खटल्यात अटक टळावी यासाठी या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. १६ मार्चला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना ३ आठवड्यांच्या आत तुरुंग प्रशासनास शरण जाण्यास सांगितले होते. हा कालावधी संपल्याने या नवलखा व तेलतुंबडे यांनी नव्याने याचिका केली. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. यावेळी त्यांनी तुरुंग प्रशासनास शरण जावे. मुंबईतील न्यायालयांचे कामकाज काही प्रमाणात सुरू असल्याची आमची माहिती आहे. त्यामुळे पुढील प्रक्रियेत काही अडचण येणार नाही, अशी टिप्पणी मिश्रा यांनी केली. त्यामुळे तेलतुंबडे आणि नवलखा यांनी आज शरणागती पत्करली.

अधिक वाचा  चतृ:शृंगीच्या दर्शनात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना सुखद धक्का; माता-भगिनींनी या निर्णयावर मानले राज्य शासनाचे आभार