वॉशिंग्टन: करोना संसर्गाच्या मुद्यावरून अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध बिघडण्याची चिन्हे आहेत. करोना विषाणूच्या फैलाविषयी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) चीनने खोटी माहिती दिल्याचा आरोप करत, चीनला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
चीनमधून करोनाच्या उद्रेकाला सुरुवात झाली असून, अमेरिकेमध्ये त्याचे सर्वांत जास्त परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर, चीनवर काय परिणाम होतील, असा प्रश्न पत्रकारांनी ट्रम्प यांना विचारला. अमेरिकेच्या काँग्रेस सदस्यांकडूनही त्याविषयी सातत्याने प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यावर उलट प्रश्न विचारत ट्रम्प म्हणाले, ‘कोणतेच परिणाम होणार नाहीत, असे तुम्ही कसे म्हणता. काय परिणाम होतील, हे मी तुम्हाला सांगणार नाही. चीनलाच ते लक्षात येईल.’
वैद्यकीय उपकरणे आणि अन्य पुरवठ्यासाठी चीनवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे, आपण आपली राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करत असून, सार्वजनिक आरोग्यही धोक्यात आणत आहोत, असा आरोप सिनेटर स्टीव्ह डेन्स यांनी ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. चीनवरील अवंबित्व कमी करावे, यासाठी चार लोकप्रतिनिधींनी सोमवारी एक विधेयकही सादर केले आहे.
दरम्यान, अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू आहे. अमेरिकेत ५ लाख ८० हजारांहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला असून मृतांची संख्या २३ हजारांहून अधिक झाली आहे. न्यूयॉर्कमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या ही चीनपेक्षाही अधिक झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.