नवी दिल्ली 15 एप्रिल: देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशात आत्तापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 11,933वर गेली आहे. तर 392 जणांचा मृत्यू झालाय. 1344 जण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 118 नवीन प्रकरणे तर 24 तासांत 39 जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर जगातल्या ज्या मोजक्या देशांनी उपाय योजना सुरू केली त्यात भारताचा समावेश होता असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे.
ते म्हणाले, चीनमध्ये 7जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर 8 जानेवारीला आम्ही तज्ज्ञांची बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आणि उपाय योजनांना सुरुवात केली असा दावाही त्यांनी केला आहे.
कोरोना व्हायरसच्या आव्हानाविरुद्ध लढण्यासाठी सरकारी पातळीवरून शक्य तितक्या सर्व पर्यायांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आधी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनच्या कालावधीत आता वाढही करण्यात आली आहे. त्यानंतर आता मोदी सरकारने त्रिस्तरीय यंत्रणा तयार केली आहे.
त्रिस्तरीय यंत्रणेअंतर्गत रुग्णालये काळजी केंद्र, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेडमध्ये विभागण्यात आली आहेत. यासर्व यंत्रणेला रुग्णवाहिकेतून जोडले गेले आहे. रुग्णांना गंभीरतेच्या तीव्रतेनुसार उपचार प्रदान केले जाणारा आहेत. सर्व कोविड-19 मधील रुग्ण गंभीर नसतात.
कोरोनाच्या जवळपास 80 टक्के रुग्णांमध्ये सामान्य लक्षणे आढळतात. त्याच वेळी 15 टक्के लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, तर 5 टक्के लोकांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. देशभरात अशी 656 रुग्णालये आहेत जी फक्त कोविड रूग्णांसाठी आरक्षित आहेत. यामध्ये एक लाखाहून अधिक बेड आहेत. त्याचबरोबर देशातील दोन लाखाहून अधिक लोकांना अलग ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत.
देशात केवळ 20 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होते. त्यामध्ये आता वाढ झाली आहे. रुग्णाच्या आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर उपलब्ध राहणार आहे. सरकारकडेही 3.26 कोटी क्लोरोक्विन गोळ्या आहेत. आयसीएमआर, एम्स यांनीही संयुक्तपणे उपचार प्रोटोकॉल तयार केले आहेत. केंद्र सरकारच्या औषध विभागाला संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बरीच औषधे उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या संदर्भात विभागाने उच्चस्तरावर आढावा बैठक घेतली.

अधिक वाचा  महायुतीत जागावाटपाची रस्सीखेच सुरुच; ‘या’ जागांसाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही, भाजपसमोर लेखाजोखा मांडला