ठाणे: कल्याणचे माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मदतकार्यात गुंतलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना करोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.
सध्या ‘होम क्वारंटाइन’ असलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील १४ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाण्यात हाती घेण्यात आलेल्या मदतकार्याच्या निमित्तानं परांजपे यांचं आव्हाड यांच्या निवासस्थानी येणं-जाणं सुरू होतं. तिथंच त्यांना करोनाचा संसर्ग झाला असावा, असा अंदाज आहे.
लॉकडाऊनमुळं सध्या हातावर पोट असलेल्या अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना आधार देण्यासाठी अनेक पक्षांचे नेते व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. गरजूंना अन्नवाटप केले जात आहे. याशिवाय, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांशी संपर्क ठेवावा लागत आहे. अनेकांशी होत असलेल्या अशा संपर्कामुळं संसर्गाची भीती वाढली आहे. राजकीय कार्यकर्त्यांची धाकधूक यामुळं वाढली आहे.
ठाणे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा २५० च्याही पुढं गेला आहे. मुंबई, पुण्यानंतर राज्यात सर्वाधिक रुग्ण याच जिल्ह्यात आढळून आले आहेत. एकट्या ठाणे शहरात ९६ बाधित रुग्ण आढळले असून तिथं आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.