ठाणे: करोना बाधित पोलिसाच्या संपर्कात आल्यानं सध्या ‘होम क्वारंटाइन’ असलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी फोनवरून विचारपूस केली. ‘माझ्यापासून काही लपवत नाहीस ना,’ असा प्रेमळ दमही त्यांनी आव्हाडांना दिला. एक फोन आला आणि जादू झाली, अशी भावना आव्हाड यांनी त्यावर व्यक्त केलीय.
खुद्द आव्हाड यांनीच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. ‘आपलेपणातून साहेबांनी फोन केला. त्यांच्या आवाजात काळजी दिसत होती. माझी प्रकृती ठीक असल्याचं सांगितल्यावर तू काही लपवत नाहीस ना, असंही ते म्हणाले. ‘सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घे आणि काही दिवस घरीच राहून लढाई लढ, असं त्यांनी सांगितल्याचं आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
‘साहेब तुम्ही कॅन्सरसारख्या दुर्धर रोगानं आजारी असताना देखील आमची लढाई लढत होतात. ही तर महाराष्ट्राच्या जनतेची लढाई आहे. प्रसंग बाका आहे. त्यामुळं शरणागती घेता येणार नाही. लोकांसाठी लढण्याचे तुमचेच संस्कार आहेत. आशीर्वाद असू द्या,’ असं आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
जितेंद्र आव्हाड सध्या होम क्वारंटाइन आहेत. कोविड १९ पॉझिटिव्ह आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यानं त्यांनी स्वत:हून क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, आव्हाड यांच्या ताफ्यातील १४ जणांना करोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे यांनाही करोनाची लागण झाल्यानं चिंता वाढली आहे.

अधिक वाचा  सुंदर अभिनेत्री बनली साध्वी; ‘महाकुंभ’मधील त्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा