मुंबई: देशात करोनामुळे होत असलेल्या मृत्यूंच्या तुलनेत महाराष्ट्रातील करोना मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. ही बाब ध्यानात घेऊन राज्य सरकारने हे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार मुंबई आणि परिसरासाठी एक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी एक अशा तज्ज्ञांच्या दोन समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे विश्लेषण करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात व मुंबई परिसरात एखाद्या रुग्णालयात करोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालयाच्या प्रमुखाने संबधित मृत रुग्णाची सविस्तर माहिती या समितीला पाठविणे तसेच समितीसमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. असे पत्र आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविले आहे.
मुंबई शहर व परिसरात करोनाची विषाणूबाधा व मृत्यूचे प्रमाण जास्त असून त्यावर उपाययोजना व विश्लेषण करण्याकरिता सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. करोनामुळे होणाऱ्या मुत्यूच्या कारणांचे विश्लेषण आणि त्यानुसार मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही समिती उपाययोजना सुचविणार आहे. त्याचबरोबर करोना उपचारासाठी रुग्णालयांना आवश्यक त्या तयारीसाठी मार्गदर्शन देखील केले जाणार आहे.
मुंबई शहरासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी के. ई. एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे असून के. ई. एम. रुग्णालयाचे औषधी वैद्यक शास्त्र प्रमुख डॉ. मिलिंद नाडकर, सायन रुग्णालयाचे अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. नितीन कर्णिक, जे. जे. रुग्णालयाचे कम्युनिटी मेडीसीनच्या प्रा. डॉ. छाया राजगुरू, जे.जे. रुग्णालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभग प्रमुख डॉ. विद्या नागर, आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे समितीच्या सदस्य सचिव आहेत.
मुंबई वगळून उर्वरित राज्य असे कार्यक्षेत्र असलेल्या दुसऱ्या समितीत सहा तज्ज्ञ सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे अध्यक्ष आहेत. राज्याच्या समितीत माजी आरोग्य संचालक डॉ. पी. पी. डोके, औषधी वैद्यक शास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. ए. एल. काकराणी व डॉ. दिलीप कदम, पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ. शशीकला सांगळे, आरोग्य सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  सुरक्षित प्रवासाचा भरवसा, प्रत्येकाच्या हाती झटपट तिकीट, बजेटमध्ये रेल्वेसाठी काय असतील खास तरतुदी जाणून घ्या